एका सेंटीमीटरच्या अपयशामुळे राष्ट्रगीत वाजले नाही; शैली सिंगची वेदना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 August 2021

सुवर्णपदक केवळ एका सेंटीमीटरने हुकले. इतक्या कमी अंतराने सुवर्णपदक हुकल्याने काय बोलणार, त्यामुळे पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकल्याचा आनंद असला तरी सुवर्णपदक असते तर हा आनंद द्विगुणित झाला असता.

नागपूर - सुवर्णपदक केवळ एका सेंटीमीटरने हुकले. इतक्या कमी अंतराने सुवर्णपदक हुकल्याने काय बोलणार, त्यामुळे पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकल्याचा आनंद असला तरी सुवर्णपदक असते तर हा आनंद द्विगुणित झाला असता, अशी भावना नैरोबी येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकणाऱ्या शैलीने व्यक्त केली.

मूळची उत्तर प्रदेशातील झांसी येथील असलेली १७ वर्षीय शैली म्हणाली, सुवर्णपदक जिंकायचेच या ईर्षेनेच मी येथे आले होते आणि तसा आत्मविश्वासही होता. सुरुवातही चांगली झाली होती. वाऱ्याचा वेगही सोबत होता. सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्टेडियममध्ये राष्ट्रगीत वाजताना ऐकायचे होते; मात्र अखेर सुवर्ण अगदी थोडक्यात हुकलेच असे शैली म्हणाली.

बंगळूर येथे अंजू जॉर्ज अकादमीत अंजूचे पती बॉबी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या शैलीने हे पदक प्रशिक्षकाला समर्पित केले. हे पदक आई किंवा प्रशिक्षकापैकी कुणाला समर्पित करशील असे विचारल्यावर ती म्हणाली, निश्चितच माझी आई ‘सिंगल पॅरेंट’ असली तरी तिने आम्हा तिन्ही भावंडांना सारखेच प्रेम दिले. तिने मला केवळ प्रशिक्षकाकडे सोपवले; मात्र पदकापर्यंत पोचवण्यात प्रशिक्षकाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे हे पदक त्यांना समर्पित करते.

नीरज प्रेरणास्थान
अंतिम फेरीपूर्वी आईने शुभेच्छा दिल्या होत्या असेही ती म्हणाली. तिची आई कपडे शिवून आपल्या तिन्ही मुला-मुलींचा सांभाळ करते. टोकियो ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने शैलीला शुभेच्छा दिल्या. याबद्दल ती म्हणाली, नीरजच्या कामगिरीमुळे आम्ही खूपच प्रेरित झालो. शुभेच्छा देऊन माझा आत्मविश्वास वाढवल्याबद्दल नीरजचे आभार मानते.

भारतीय खेळाडूंचे जबरदस्त यश महासंघाने आखलेल्या नियोजनाचे आणि प्रशिक्षणाचे फळ होय. या यशामुळे भारतीय अॅथलेटिक्सला दिशा मिळेल आणि अनेक नवोदित खेळाडू प्रोत्साहित होतील. या युवा खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली असली किंवा पदके जिंकली असली तरी त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका. कारण या खेळाडूंना अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.’
- आदिल सुमारीवाला, अध्यक्ष, भारतीय अॅथलेटिक्स महासंघ


​ ​

संबंधित बातम्या