पायाला दुखापत झाल्यावरही राहीचा रौप्यपदकाचा वेध

संजय घारपुरे, सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 March 2021

राहीने स्पर्धेपूर्वीचा सराव पुण्यात केला. तिला या दरम्यान बाहेर गेले असताना टाचेला एक खडा टोचला. त्यावेळी तिला फार काही जाणवले नाही, पण काही दिवसांतच तिथे त्रास होण्यास सुरुवात झाली.

मुंबई : विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेपूर्वी दोन आठवडे पुण्यात असताना राहीला एक खडा टोचला आणि त्यातून वाढलेल्या दुखण्यामुळे तिला स्पर्धेपूर्वी काही दिवसांपर्यंत शूज घालणेही अवघड झाले होते, पण त्या परिस्थितीतही सराव करीत राहीने विश्‍वकरंडक स्पर्धेत रौप्यपदकाचा वेध घेतला.

राहीने स्पर्धेपूर्वीचा सराव पुण्यात केला. तिला या दरम्यान बाहेर गेले असताना टाचेला एक खडा टोचला. त्यावेळी तिला फार काही जाणवले नाही, पण काही दिवसांतच तिथे त्रास होण्यास सुरुवात झाली. लगेच ती डॉक्‍टरांकडे गेली. डॉक्‍टरांनी तिथे उपचार करून पट्टी बांधली. त्यामुळे सराव करताना शूज घालणे अवघड झाले होते. मात्र याबाबत विचारल्यावर काही वर्षांपूर्वी माझ्या हाताला दुखापत झाली होती, त्या तुलनेत ही दुखापत काहीच नाही, असे राहीने सांगितले. 

Shooting World Cup : राहीचा 'चंदेरी' वेध! शूट आउटमध्ये चिंकीनं पटकावलं सुवर्ण

स्पर्धेपूर्वीच्या शिबिरात सराव करताना मला शूज घालता येत नव्हता. त्याचा त्रास होत असे. डॉक्‍टरांनी ती जखम जास्तीत जास्त मोकळी ठेवायला सांगितली होती. आता स्पर्धेचा विचार करून दुखण्यावर बांधलेली पट्टी पातळ होती. तसेच ट्रान्सपरंट होती, त्यामुळे शूज घातल्यावर तो घट्ट असल्याचे जाणवत नव्हते. सरावाच्यावेळी पाच-सहा दिवसांपासून शूज घालत आहे. मी शिबिराच्या ठिकाणी आले, त्यावेळी हिला नीट चालताही येत नव्हते पण नेमबाजी करताना त्रास होत नव्हता. त्याचबरोबर नियमितपणे ड्रेसिंग केल्यामुळेच खेळू शकले, असे तिने सांगितले. 
 


​ ​

संबंधित बातम्या