SakalSportsToday: खेळ जगतातील अन्य काही प्रमुख घडामोडी  

संजय घारपुरे
Tuesday, 15 December 2020

मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धेसाठी श्रीशांत केरळच्या संभाव्य संघात, नेशन्स कपमध्ये भारतीय संघ विजेता, ऑनलाईन बुद्धिबळमध्ये रसुलोव विजेता, जमशेदपूरला उद्यापासून गोल्फ स्पर्धा   

मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धेसाठी श्रीशांत केरळच्या संभाव्य संघात 
वेगवान गोलंदाज श्रीशांतची मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धेसाठी केरळच्या संभाव्य संघात निवड करण्यात आली आहे. 2013 च्या आयपीएल निकालनिश्‍चितीत सहभागी असल्याचा ठपका ठेवत श्रीशांतवर बंदी घालण्यात आली होती; पण न्यायालयात यास श्रीशांतने आव्हान दिले. त्याला 13 सप्टेंबरपासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची मंजुरी देण्यात आली. रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन यांचा समावेश असलेल्या संघाचे शिबिर 20 डिसेंबरपासून होणार आहे. 

युवीचे षटकार पुन्हा पाहायला मिळणार; T20 तून कॅमबॅक करण्याचे संकेत

नेशन्स कपमध्ये भारतीय संघ विजेता 
मुंबईच्या आशी हंसपाल हिचा समावेश असलेल्या भारतीय संघाने दुबई कार्टिंग स्पर्धेतील नेशन्स गटात विजेतेपद मिळवले; तसेच सर्वांगीण क्रमवारीत दुसरा आला. बॉम्बे स्कॉटिश शाळेत नववीत शिकत असलेल्या आशीसह भारतीय संघात अर्जुन मंजुनाथ, रचित सिंघल, जेमी आणि आदित्य स्वामिनाथन यांचा समावेश आहे. 

''पहिल्या सामन्यात सलामीवीर म्हणून शुभमन गिल हा योग्य पर्याय'...

ऑनलाईन बुद्धिबळमध्ये रसुलोव विजेता 
अझरबैझानचा ग्रॅंडमास्टर व्हुगर रसुलोव याने शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद जिंकले. शिवनेरने घेतलेल्या या स्पर्धेत रसुलोव्हने सर्वाधिक 12 गुण नोंदवले. त्याने गुजरातच्या कर्तव्य अनाडकट याला अर्ध्या गुणाने मागे टाकले. लीचेस प्लॅटफॉर्मवरील या स्पर्धेत भारतासह रशिया, इंडोनेशिया, अझेरबैझान, बांगलादेशमधील एकंदर 275 खेळाडूंचा सहभाग होता.

अंतिम क्रमवारी : 1) व्हुगर रसुलोव (अझरबैझान), 2) कर्तव्य अनाडकट (गुजरात), 3) धुलीपल्ला बीसीपी (आंध्र प्रदेश), 4) आर. आर. लक्ष्मन (तमिळनाडू), 5) आर्यन वार्ष्णेय (दिल्ली), 6) निखिल दीक्षितने (महाराष्ट्र), 7) अरुल आनंधने (तमिळनाडू), 8) गोपाळ राठोड (महाराष्ट्र). 

AUSvsIND: कोहलीने शतक केल्यास नावावर होऊ शकतो रिकी पॉन्टिंगचा रेकॉर्ड  

जमशेदपूरला उद्यापासून गोल्फ स्पर्धा 
टाटा स्टील अखिल भारतीय गोल्फ स्पर्धा 17 डिसेंबरपासून जमशेदपूरला होईल. दीड कोटी रुपये बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत सव्वाशे स्पर्धकांचा सहभाग अपेक्षित आहे. देशांतर्गत व्यावसायिक गोल्फ मालिकेतील ही सातवी स्पर्धा आहे.


​ ​

संबंधित बातम्या