ऑलिंपिक स्पर्धेत पदक वितरण होणार नाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी थेट पदक वितरण सोहळ्यास लक्ष्य करण्यात आले आहे. एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी आता ऑलिंपिक स्पर्धेत पदक वितरण होणार नाही, त्याऐवजी पदक विजेत्यांना स्वहस्तेच पदक गळ्यात घालण्याची सूचना करण्यात आली आहे.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी थेट पदक वितरण सोहळ्यास लक्ष्य करण्यात आले आहे. एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी आता ऑलिंपिक स्पर्धेत पदक वितरण होणार नाही, त्याऐवजी पदक विजेत्यांना स्वहस्तेच पदक गळ्यात घालण्याची सूचना करण्यात आली आहे. 

टोकियोत एकंदर ३३९ स्पर्धा शर्यतीत पदकांसाठी चुरस असेल. ऑलिंपिकसारख्या बहुविध क्रीडा सोहळ्यात पदक वितरण सर्वात लक्षवेधक असते. पदक देण्याचा बहुमान विविध क्रीडा महासंघाचे प्रमुख, राजकीय नेते, विविध देशांचे प्रमुख, तसेच प्रसंगी सेलिब्रिटीजनाही देण्यात आला आहे. पदकासह स्पर्धेचे बोधचिन्हही दिले जात असे; पण या वेळी पदक वितरणाचा सोहळाच नसेल. 

कोणत्याही विजेत्यांच्या गळ्यात पदक घातले जाणार नाही. ही पदके विजेत्यांसमोर ट्रेमधून आणण्यात येतील. पदकविजेते या ट्रेमधून आपले पदक घेऊन गळ्यात घालतील, असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी सांगितले. या ट्रेमध्ये पदक ठेवणाऱ्या व्यक्तीने निर्जंतुक केलेले ग्लोव्हज् घातलेले असतील. अन्य कोणाचाही स्पर्श त्या पदकास झालेला नसेल, असेही त्यांनी सांगितले.

पदक वितरणाच्या वेळी कोणीही एकमेकांबरोबर हस्तांदोलन करणार नाही; तसेच एकमेकांना आलिंगनही देणार नाही, असे बाक यांनी स्पष्ट केले. त्यांनी यापूर्वी पदकाचा स्वीकार करताना खेळाडूंना तसेच त्या वेळी असलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी मास्क बंधनकारक असेल, असे सांगितले होते. टोकियोतील कोरोना रुग्ण सतत वाढत असताना, तसेच तिथे कोरोना रोखण्यासाठी आणीबाणी असताना स्पर्धा होत आहे. 

युरो स्पर्धेतील पदक वितरण मास्कविना
काही दिवसांपूर्वी संपलेल्या युरो फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेत्या तसेच उपविजेत्या संघातील खेळाडूंच्या गळ्यात युरोपिय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष अलेक्झांडर सेफेरीन यांनी पदक घातले होते; तसेच त्यांनी स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेला इटलीचा गोलरक्षक गिआनलुईगी दोन्नारुम्मा याच्यासह हस्तांदोलनही केले होते. काही खेळाडूंना शाबासकीही दिली होती. एवढेच नव्हे, तर या वेळी कोणीही मास्क परिधान केला नव्हता; तसेच त्यांच्यात सुरक्षित अंतरही नव्हते. मात्र ऑलिंपिक स्पर्धेत यापैकी काहीही होणार नाही.


​ ​

संबंधित बातम्या