शरथ कमाल-मनिकाची मिश्र दुहेरीतही ऑलिंपिक पात्रता

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 March 2021

अंतिम सामन्यात पहिल्या दोन सेटमध्ये त्यांची मोठी पीछेहाट झाली होती. एकतर्फी पराभवास सामोरे जावे लागणार असे चित्र होते, परंतु या दोघांनी तेथूनच खेळ उंचावत नेला आणि विजेतेपदास गवसणी घातली.

मुंबई : भारताचे स्टार टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमाल आणि मनिका बात्रा यांनी आशिया ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धक्कादायक आणि सनसनाटी विजय मिळवून विजेतेपद तर मिळवलेच, परंतु त्याचबरोबर टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी मिश्र दुहेरीचा कोटाही मिळवला. भारताच्या या जोडीने अव्वल मानांकन असलेल्या कोरियाच्या सॅंग सू ली आणि जिही ज्यून यांचा दोन सेटच्या पिछाडीवरून 8-11, 6-11, 11-5, 11-6, 13-11, 11-8 असा पराभव केला. 2018 च्या आशिया स्पर्धेत शरथ कमाल आणि मनिका बात्रा यांनी मिश्र दुहेरीचे ब्राँझपदक जिंकले होते.

अंतिम सामन्यात पहिल्या दोन सेटमध्ये त्यांची मोठी पीछेहाट झाली होती. एकतर्फी पराभवास सामोरे जावे लागणार असे चित्र होते, परंतु या दोघांनी तेथूनच खेळ उंचावत नेला आणि विजेतेपदास गवसणी घातली. शरथ कमाल आणि मनिका यांनी जी. साथियन व सुतिर्थ मुखर्जीसह एकेरीत ऑलिंपिक पात्रताही मिळवलेली आहे. उपांत्य सामन्यातही शरथ कमाल आणि मनिका यांना कडव्या लढतीचा सामना करावा लागला होता. कोएन पॅंग यी आणि लीन ये या जोडीवर त्यांनी 12-10, 9-11, 11-5, 5-11, 11-8,13-11 अशी मात केली होती. तो सामना 50 मिनिटे चालला होता.

ऑलिंपिकसाठी 90 हजार परदेशी रहिवाशांची मर्यादा

मनिका आणि मी मिळवलेला हा सर्वोत्तम मोठा विजय आहे. आजच्या या सामन्यासाठी मला पहाचे पाच वाजताच जाग आली होती. ऑलिंपिक पात्रतेसाठी अवघा एक विजय दूर असल्याने दडपण होते, पण आम्ही हे यश साध्य केले. - शरद कमाल

ताकदवर असलेल्या प्रतिस्पर्ध्यांच्या आक्रमक सर्विस परतवण्यात मी यशस्वी ठरले. शरद भैयाने प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण थोपवले. एकेरीबरोबर आता मिश्र दुहेरीतही ऑलिंपिक पात्रता मिळवल्याचा आनंद आहे. -मनिका बात्रा


​ ​

संबंधित बातम्या