फॉर्म्युला वनमधील धोका पुन्हा अधोरेखित 

संजय घारपुरे
Monday, 30 November 2020

फॉर्म्युला वन कारचे दोन तुकडे होऊन ती जळाल्यानंतरही केवळ हाताला जखमा होऊन रोमेन ग्रॉसजेन बचावला.

लंडन : फॉर्म्युला वन कारचे दोन तुकडे होऊन ती जळाल्यानंतरही केवळ हाताला जखमा होऊन रोमेन ग्रॉसजेन बचावला. मात्र फॉर्म्युला वनचा थरार किती धोकादायक होऊ शकतो याची जाणीव या अपघातामुळे पुन्हा करून दिली. 

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाला धक्का; तिसऱ्या वन-डे व टी-ट्वेन्टीमधून हुकमी एक्का...

या अपघाताची आधुनिक शर्यतीत कोणीही कल्पनाही केली नसेल. शर्यतीच्या मार्गाशेजारील कुंपणावर ग्रॉसजेनची कार ताशी 250 किमी वेगाने आदळली. त्याचे दोन तुकडे झाले. गाडीने पेट घेतला. त्या गाडीने कुंपण तोडले होते. ग्रॉसजेन या अपघातग्रस्त पेटलेल्या गाडीत अर्धा मिनीट होता. त्याने सीटबेल्टमधून स्वतःची सुटका करून घेतली आणि प्रसंगावधान राखत स्वतःला बाहेर काढले होते. कार विझवण्यास सुरुवात होत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रॉसजेनला मदत केली होती. 

विराटची कॅप्टन्सी समजण्यापलीकडे; गौतम गंभीरची टीका   

गेल्या काही वर्षांत फॉर्म्युला वनने सुरक्षेस महत्त्व दिल्यामुळेच ग्रॉसजेन बचावला असेच मानले जात आहे. हॅलो हेड यंत्रणेमुळेच तो वाचू शकला. चालकाच्या डोक्‍याभोवती असलेल्या या यंत्रणेमुळे कार आपटल्यावरही ग्रॉसजेन वाचू शकला. 1994 मध्ये आर्यटन सेनाचे निधन झाल्यानंतर कार जास्त सुरक्षित झाली. 2014 मध्ये ज्यूल्स बिआंची याला अपघात झाला, त्यावेळी डोक्‍याला दुखापत होऊ नये याची यंत्रणा विकसित करणे सुरू होते. आश्‍चर्य म्हणजे ग्रॉसजेनला वाचवण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या हॅलो हेड यंत्रणेस अनेक फॉर्म्युला वन पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. 

धोकादायक फॉर्म्युला वन 
- 1991 च्या मोनॅको शर्यतीच्यावेळी यापूर्वी कार तुटली होती. 
- 1989 च्या इमोला शर्यतीच्यावेळी कारला आग लागली होती. 
- 1973 मध्ये कार अडथळ्यावर वेगाने आपटून झालेला अपघातात फ्रॅंकॉईस केव्हेर्ट यांचे निधन. 
- 1974 मध्ये याच प्रकारे झालेल्या अपघातात हेम्लत कॉईनिग यांचे निधन. हे दोन्ही अपघात वॅटकिन्स ग्लेन (अमेरिका) येथे 

अपघात पाहून धास्ती वाटली. अपघातानंतरची त्याची कार, कॉकपीट पाहून तो कसा बाहेर पडला हेच कळत नाही. त्यावेळी त्याने धैर्य कसे राखले. हॅलो हेड यंत्रणा नसती तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही. 
- लुईस हॅमिल्टन, फॉर्म्युला वन शर्यतीचा विजेता. 

काही वर्षांपूर्वी हॅलो हेड यंत्रणेस मी विरोध केला होता. मात्र फॉर्म्युला वन शर्यतीतील ही सर्वात महत्त्वाची बाब असल्याची खात्री आता मला झाली आहे. अन्यथा आज मी बोलूच शकलो नसतो. 
- रोमेन ग्रॉसजेन, अपघातग्रस्त स्पर्धक. 


​ ​

संबंधित बातम्या