मल्लेश्वरी क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरू
दिल्ली सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला दिल्ली क्रीडा विद्यापीठ सुरू होत असून, त्याच्या पहिल्या कुलगुरू होण्याचा मान प्रसिद्ध वेटलिफ्टर आणि पहिल्या महिला ऑलिंपिक पदकविजेत्या कर्णम मल्लेश्वरी यांना देण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - दिल्ली सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला दिल्ली क्रीडा विद्यापीठ सुरू होत असून, त्याच्या पहिल्या कुलगुरू होण्याचा मान प्रसिद्ध वेटलिफ्टर आणि पहिल्या महिला ऑलिंपिक पदकविजेत्या कर्णम मल्लेश्वरी यांना देण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे.
खेळाडूंना चांगले प्रशिक्षण देऊन त्यांनी देशाचा नावलौकिक वाढवावा, खेळाडूंच्या प्रतिभेला चालना मिळावी, या उद्देशाने दिल्ली सरकार क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची योजना आखली होती. त्यानुसार आता हे विद्यापीठ सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, की विविध खेळांमध्ये खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये ५० पदके जिंकून देशाचा गौरव वाढवावा. त्यादृष्टीने हे विद्यापीठ महत्त्वपूर्ण कामगिरी करेल.
विद्यापीठात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. किमान दहा खेळांमधील आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या विद्यापीठातून मिळणारी पदवी ही इतर मुख्य प्रवाहातील पदव्यांना समकक्ष असेल. जगातील सर्वोत्तम क्रीडा विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाची गणना होईल, अशा पद्धतीने त्यांची उभारणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली सरकारने २०१९ मध्ये दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी (डीएसयू) स्थापन करण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले होते.