आशियाई कुस्ती - ग्रीको रोमन कुस्तीगीर उपांत्य फेरीतच गारद

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 April 2021

आशियाई कुस्तीच्या ग्रीको रोमन प्रकारातील पहिल्या दिवशी भारताच्या पदरी घोर निराशाच आली.

मुंबई : संदीप आणि गुरप्रीत सिंगला असलेली ब्राँझ पदकाची संधी सोडल्यास आशियाई कुस्तीच्या ग्रीको रोमन प्रकारातील पहिल्या दिवशी भारताच्या पदरी घोर निराशाच आली. भारतीय ग्रीको रोमन कुस्तीचा पोस्टर बॉय समजला जाणारा सुनील कुमार उपांत्यपूर्व फेरीतच पराजित झाला.

संदीप (५५ किलो) आणि गुरप्रीत (७७ किलो) हे उपांत्य फेरीत पराजित झाले. नीरज (६३ किलो), नवीन (१३० किलो) आणि सुनील (८७ किलो) यांना निराशाच केली. सुनील भारताच्या मोहिमेस जोरदार सुरुवात करून देईल अशी आशा होती, पण तो पहिल्याच फेरीत अॅसाकोलाव याच्याविरुद्ध १-३ असा पराजित झाला. अॅसाकोलाव याने जागतिक स्पर्धेत ब्राँझ पदक जिंकले आहे. त्याला प्रतिकार केल्याचेच समाधान सुनीलला लाभले.

गुरप्रीतला इराणच्या पोश्ताम पेजमन याच्याविरुद्ध ७-७ बरोबरीनंतर हार पत्करावी लागली. त्याने उपांत्यपूर्व फेरीत १-५ पिछाडीनंतर उझबेकिस्तानच्या नालगिएव बायलन याला ११-८ असे हरवले होते. ऑलिंपिक पात्रता आणि आशियाई स्पर्धा लागोपाठ होत आहेत. चुरशीच्या लढतीतून सावरण्यासच वेळ मिळत नाही, असे गुरप्रीतने उपांत्यपूर्व लढतीतील विजयानंतर सांगितले होते. तेच उपांत्य लढतीत जाणवले. गुरप्रीत थकल्याचे मी ओळखले होते, असे पोश्तामने सांगितले.
 


​ ​

संबंधित बातम्या