पी. कश्‍यपची उपांत्य फेरीत धडक

वृत्तसंस्था
Friday, 27 September 2019

-भारताच्या पारुपल्ली कश्‍यप याने डेन्मार्कच्या यान यॉर्गेनसेन याचे आव्हान परतवून लावत कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

-कश्‍यपने शुक्रवारी झालेल्या लढतीत यॉर्गेनसेन याचे आव्हान 24-22, 21-8 असे परतवून लावले. 

-उपांत्य फेरीत त्याच्यासमोर जपानच्या केंटो मोमोटा याचे आव्हान असेल. 

इंचेऑन (कोरिया) - भारताच्या पारुपल्ली कश्‍यप याने डेन्मार्कच्या यान यॉर्गेनसेन याचे आव्हान परतवून लावत कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कश्‍यपने शुक्रवारी झालेल्या लढतीत यॉर्गेनसेन याचे आव्हान 24-22, 21-8 असे परतवून लावले. 
उपांत्य लढतीतील पहिली गेम कमालीची चुरशीची झाली. दोघांकडून सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन पहायला मिळाले. यात कश्‍यपने संयम राखून बाजी मारली. दुसऱ्या गेमला मात्र कश्‍यपने प्रतिस्पर्ध्याला संधीच दिली नाही. आता उपांत्य फेरीत त्याच्यासमोर जपानच्या केंटो मोमोटा याचे आव्हान असेल. 
कश्‍यप या स्पर्धेत पात्रता फेरीतून आला होता. पाच वर्षांपूर्वी कश्‍यप आणि यॉर्गेनसेन यांच्यात डेन्मार्क ओपन स्पर्धेत लढत झाली होती. त्यानंतर प्रथमच हे दोघे आमने सामने आले होते. 
पहिल्या गेममध्ये सुरवातीच्या आठ गुणांपर्यंत छोट्या रॅलिज पहायला मिळाल्या. बॅकहॅंड फटक्‍यातील चुकांमुळे कश्‍यपला 5-8 अशी पिछाडी सहन करावी लागली. त्यानंतर सातत्याने त्याच्या फटक्‍यांमधील अचूकता हरवली होती. गेमच्या मध्याला यॉर्गेनसेन याने 11-8 अशी आघाडी मिळविली होती. कोर्ट बदलल्यावर लढतीचे चित्रही पालटले. कश्‍यपच्या फटक्‍यात अचूकता आली, तर यॉर्गेनसेनचे फटके नेटमध्ये अडकू लागले. कश्‍यपे क्रॉस कोर्ट स्मॅश प्रतिस्पर्ध्याची कसोटी पाहू लागले. त्यानंतरही लढत 14-14, 18-18 अशी बरोबरीत सुरू होती. कश्‍यपने एक गुण घेत आघाडी घेतली, पण लगेच ती गमावलीदेखील. या स्थितीनंतर आघाडीच्या पकडापकडीचा खेळ सुरू झाला. कश्‍यपने मोक्‍याच्या वेळी एका गुणाची आघाडी घेतली आणि नंतर एक गेम पॉइंट मिळवत पहिली गेम 22 मिनिटांत जिंकली. 
दुसरी गेम तशीच बरोबरीवर सुरू झाली. मात्र, 3-3 अशा बरोबरीनंतरकश्‍यपने सलग पाच गुणांची कमाई करत मुसंडी मारली आणि गेमच्या मध्याला 11-7 असे नियंत्रण ठेवले. त्यानंतरची लढत एकतर्फीच झाली. यॉर्गेनसेनला केवळ एकच गुण मिळविता आला. कश्‍यपने आपल्या आक्रमणाने त्याला निष्प्रभ केले. 


​ ​

संबंधित बातम्या