पी. कश्‍यप उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था
Thursday, 26 September 2019

-भारताच्या पारुपल्ली कश्‍यप याने कोरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान राखले आहे.

-त्याने संघर्षपूर्ण लढतीत मलेशियाच्या डॅरेन लियू याचा 21-17, 11-21, 21-12 असा पराभव करून पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

-त्याची गाठ आता स्विडनच्या यान यॉर्गेन्सेनशी पडणार आहे.

इंचेऑन (कोरिया) - भारताच्या पारुपल्ली कश्‍यप याने कोरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान राखले आहे. त्याने संघर्षपूर्ण लढतीत मलेशियाच्या डॅरेन लियू याचा 21-17, 11-21, 21-12 असा पराभव करून पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कश्‍यप हा एकटाच या स्पर्धेत भारताचे आव्हान राखून आहे. पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 
पहिल्या गेममध्ये सुरवातीला लियूने आघाडी राखली होती. मात्र, त्याला आघाडीचा फरक वाढवता आला नाही. याचा फायदा घेत कश्‍यपने सलग चार गुण घेत गेमच्या मध्याला 11-8 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर काश्‍यपने सातत्याने आघाडी कायम राखली. लियूने 12-16 ही चार गुणांची पिछाडी भरून काढताना 15-16 अशी मजल मारली. मात्र, कश्‍यपने आपल्या खेळावर नियंत्रण राखताना त्याने 18-17 या स्थितीतून सलग तीन गुणांची कमाई करत पहिली गेम जिंकली. दुसऱ्या गेमला लियूचे कमालीचे वर्चस्व होते. कश्‍यपने गेमला 2-0 अशी भलेही सुरवात केली. पण, लियूने नंतर सलग 13 गुणांची कमाई करताना 13-2 अशी आघाडी घेत कश्‍यपला आपला खेळ दाखविण्याची संधीच दिली नाही. त्यानंतर कश्‍यपला केवळ आणखी नऊ गुण मिळविता आले. 
निर्णायक गेमदेखील एकतर्फी झाली. अगदी दुसऱ्या गेमप्रमाणेच हे चित्र राहिले. फरक इतकाच की या वेळी आघाडी कश्‍यपची राहिली. काश्‍यपने 0-2 अशा पिछाडीनंतर सलग 12 गुणांची कमाई करताना 12-2 अशी आघाडी मिळविली आणि लियूला आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. त्याची गाठ आता स्विडनच्या यान यॉर्गेन्सेनशी पडणार आहे. त्याने आठव्या मानांकित ऍन्थोनी गिंटिंग याचा 17-21, 21-16, 21-13 असा पराभव केला. 
 


​ ​

संबंधित बातम्या