World Cup 2019 : भारतीय क्रिकेट संघाच्या भगव्या जर्सीवरून 'राजकारण'

वृत्तसंस्था
Wednesday, 26 June 2019

भारतीय क्रिकेट संघाची ही नवी जर्सी भगव्या रंगाची करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्ध (30 जून) होणाऱ्या पुढील सामन्यात भारतीय संघ नवी जर्सी घालून मैदानात उतरेल.

वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये सध्या क्रिकेट विश्व करंडक स्पर्धा सुरू असून भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीमध्ये पुढील सामन्यासाठी थोडा बदल करण्यात आला आहे. या नव्या रंगातील जर्सीची पहिली छबी आज (बुधवार) प्रकाशित करण्यात आली. 

भारतीय क्रिकेट संघाच्या बदलण्यात आलेल्या जर्सीच्या रंगाबाबत देशभरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीदेखील उडी घेतली आहे. आझमींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत भारतीय क्रिकेट संघाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

अबू आझमी म्हणाले की, ''भारतीय संघाची कामगिरी ही प्रशंसनीय आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकार देशाचे भगवीकरण करीत आहे. देशात कोणताही विकास केला नसल्याने बेरोजगारी वाढत चालली आहे, महागाईदेखील वाढत आहे. तरी देखील लोकांनी मोदींना निवडून दिले ही आश्चर्याची गोष्ट आहे. जर भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीला रंग द्यायचा होता, तर तो तिरंग्याचा द्यायला हवा होता. भगवा रंग देणे हे साफ चुकीचे आहे.''

भारतीय क्रिकेट संघाची ही नवी जर्सी भगव्या रंगाची करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्ध (30 जून) होणाऱ्या पुढील सामन्यात भारतीय संघ नवी जर्सी घालून मैदानात उतरेल. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग निळा असल्यामुळे हा छोटा बदल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत झालेले सर्व सामने भारतीय संघ निळ्या रंगाची जर्सी घालून खेळला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) होम-अवे नियमानुसार ज्या संघांच्या जर्सीचे रंग मिळतेजुळते आहेत, त्या संघांनी पर्यायी  दुसऱया रंगाची जर्सी वापरावी, असे स्पर्धेच्या सुरवातीलाच जाहीर केले होते. त्यामुळे भारतीय संघाला दुसरी जर्सी तयार ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर भारतीय संघाची नवी जर्सी कोणत्या रंगाची असेल, अशी चर्चा देशभर सुरू झाली होती. भारतीय संघासाठी भगव्या रंगाची जर्सी तयार केली जाणार या चर्चेने नंतर सर्वत्र जोर धरला होता. या भगव्या 'जर्सी'चा लूक नेमका कसा असेल, याबाबत आतापर्यंत सर्वत्र चर्चा सुरू होती. मात्र, आज या नव्या रंगातील जर्सीचे अनावरण करण्यात आल्यानंतर तिचा पहिला लूक सर्व क्रिकेटप्रेमींसमोर आला आहे.

जर्सीचा रंग न बदलण्याबाबत इंग्लंडला सूट का? 
भारत, इंग्लंड, श्रीलंका, अफगाणिस्तान संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाणार असून त्यापैकी एका संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे. नियमानुसार यजमान संघाला त्यांच्या जर्सीचा रंग कायम ठेवण्यात येतो. त्यामुळे इंग्लंडचा संघ आपल्या निळ्या रंगाच्या जर्सीमध्येच भारताविरुद्धचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या