युरो विजेत्या पोर्तुगालचीच युरोपात हुकमत 

वृत्तसंस्था
Tuesday, 11 June 2019

ख्रिस्तियानो रोनाल्डोचे अखेर मायदेशात पोर्तुगालसाठी विजेतेपदाचा करंडक उंचावण्याचे स्वप्न साकारले. पोर्तुगालने पहिल्या यूएफा नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जिंकताना नव्याने संघउभारणी करीत असलेल्या नेदरलॅंड्‌सचे आव्हान परतवत बाजी मारली. 

पोर्तो : ख्रिस्तियानो रोनाल्डोचे अखेर मायदेशात पोर्तुगालसाठी विजेतेपदाचा करंडक उंचावण्याचे स्वप्न साकारले. पोर्तुगालने पहिल्या यूएफा नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जिंकताना नव्याने संघउभारणी करीत असलेल्या नेदरलॅंड्‌सचे आव्हान परतवत बाजी मारली. 

पोर्तुगालने अंतिम लढत 1-0 जिंकली. या निर्णायक गोलात रोनाल्डोचा सहभाग नव्हता. रोनाल्डो सोडल्यास पोर्तुगालने नवोदितांना संधी दिली होती. 22 वर्षीय गोन्सालो गुएदेस याने पोर्तुगालचा निर्णायक गोल केला. त्याने मथियास दे लिग्त, बर्नार्डो सिल्वा यांच्या साथीत चाल रचली होती. गुएदेसने गोलक्षेत्रात प्रवेश करीत असतानाच चेंडूला किक करीत निर्णायक गोल केला. हा त्याचा सतराव्या आंतरराष्ट्रीय लढतीतील चौथा गोल. 

पोर्तुगालने चेंडूवर 45 टक्केच हुकमत राखली होती; पण त्यांच्या चाली जास्त प्रभावी होत्या. त्यांनी तीन वर्षांपूर्वीच्या युरो विजेतेपदापाठोपाठ ही स्पर्धा जिंकली. त्यांची ही दोन्ही विजेतीपदे फर्नांडो सॅंतोस यांच्या मार्गदर्शनाखाली होती. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही एकमेकांसोबत आहोत. आमचे एक कुटुंब झाले आहे. प्रत्येकाला कोण काय करू शकते याची पूर्ण जाणीव आहे. आपणच अंतिम लढत जिंकणार याची प्रत्येकास खात्री होती, असे सॅंतोस यांनी सांगितले. 

नेशन्स लीग विजेतेपद युरो विजेतेपदाइतके महत्त्वाचे नसले, तरी ते घरच्या मैदानावर जिंकले याचे पोर्तुगालला समाधान असेल. पोर्तुगालने 2004 मध्ये युरो स्पर्धा घेतली होती, त्या वेळी ते अंतिम सामन्यात ग्रीसविरुद्ध पराजित झाले होते. त्या संघातील रोनाल्डोच सध्याच्या संघात आहे. 

सॅंतोस यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून पोर्तुगालने 38 पैकी दोनच सामने गमावले आहेत, त्याचबरोबर गेल्या दहा सामन्यांत ते अपराजित आहेत. काहीशा सावध सुरवातीनंतर पोर्तुगालचे योजनाबद्ध आक्रमण सुरू झाले. त्या वेळी जणू रोनाल्डो त्यांचा राखीव हुकमी एक्का आहे असेच चित्र निर्माण केले जात होते. त्याने गोलचा केवळ एक प्रयत्न केला. ब्रुनो फर्नांडिस आणि सिल्वाने नेदरलॅंड्‌सवरील दडपण कायम ठेवले. नेदरलॅंड्‌सला पूर्वार्धात एकही भक्कम चाल करता आली नाही. उत्तरार्धात पोर्तुगालच्या आक्रमणास यश आले. त्यानंतर नेदरलॅंड्‌स काहीसे आक्रमक झाले; पण त्या वेळीही पोर्तुगालच जिंकणार हे स्पष्ट दिसत होते. 

इंग्लंड गोलरक्षकाचा गोल निर्णायक 
इंग्लंड गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने केवळ गोल रोखलाच नाही, तर गोल केलाही, त्यामुळे इंग्लंडने स्वित्झर्लंडला पेनल्टी शूटआउटवर 6-5 असे पराजित केले. निर्धारित तसेच जादा वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर पिकफोर्ड बहरला. त्याने जॉसिप द्रिमी याची किक उजवीकडे झेपावत रोखली, तसेच डाव्या पायाने जोरदार किक करीत इंग्लंडचा गोलही केला. त्याच्या यशामुळे इंग्लंडने 1968 नंतर प्रथमच तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकली. 

जोपर्यंत शक्‍य आहे, तोपर्यंत पोर्तुगालकडून खेळत राहणार. पोर्तुगालकडून खेळतो त्या वेळी घरच्या मैदानावर खेळत आहे असेच वाटते. सोळा वर्षे या संघात आहे, तरी तेवढाच उत्साह, जोष आहे. पोर्तुगालकडून कायम सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न होता आणि राहील. 
- ख्रिस्तियानो रोनाल्डो 


​ ​

संबंधित बातम्या