राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रगतीस रौप्यपदक 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 November 2019

 प्रगतीचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील सलग हे तिसरे पदक आहे. 

बिजवडी (जि. सातारा) : दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची मल्ल प्रगती गायकवाड हिने रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राचे सलग तिसऱ्या वर्षी प्रतिनिधित्व करताना तिने 14 वर्षांखालील 46 किलो वजनगटात एकतर्फी कुस्त्या केल्या. 

पांगरी (ता. माण) येथील मल्ल प्रगती गायकवाड ही पुणे येथे शालेय शिक्षण घेत असून, तेथून ती या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे. या स्पर्धेत तिने पहिल्या फेरीमध्ये पश्‍चिम बंगालची मल्ल क्रिती हिला चितपट केले. दुसऱ्या फेरीत हरियानाची मल्ल तपस्या हिच्याबरोबर चुरशीची कुस्ती झाली. अखेर तपस्या हिला दहा-सहाच्या गुणाने पराभूत करून उपांत्यफेरीत प्रवेश मिळवून सुवर्णपदकाच्या आशा कायम ठेवल्या.

उपांत्यफेरीमध्ये सीबीएससीची मल्ल अंजली हिला 10-2 ने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश पक्का केला. अंतिम कुस्ती लढत दिल्लीची मल्ल गायत्री हिच्याबरोबर निश्‍चित झाली. सुवर्णपदकाच्या लढतीमध्ये गायत्री हिच्याबरोबर अटीतटीची लढत झाली. प्रगतीने दीड मिनिटामध्ये गायत्रीला चितपट करुन राैप्यपदक पटकाविले. 

प्रगतीचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील सलग हे तिसरे पदक आहे. यापूर्वी प्रगतीने महाराष्ट्राला सलग दोन वर्षे कास्यपदक मिळवून दिले आहे. तसेच राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सलग तीन वर्षे "सुवर्णपदक' मिळविले आहे. 

पैलवान प्रगती ही पुणे पिंपरी-चिंचवड येथे राहात असून, शालेय शिक्षण प्रेरणा माध्यमिक विद्यालय, निगडी प्राधिकरण येथे इयत्ता नववीमध्ये घेत आहे. तिला वडील विनोद गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

हेही वाचा : काेल्हापूरच्या सुदेष्णा शिवणकरने गाजविला पहिला दिवस
 


​ ​

संबंधित बातम्या