साईप्रणितचे आव्हान संपुष्टात

वृत्तसंस्था
Saturday, 21 September 2019

-भारताच्या बी. साईप्रणित याला तीन गेमच्या संगर्षपूर्ण लढतीनंतर चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ऍन्थोनी सिनिसुका गिंटींगकडून पराभव पत्करावा लागला.

-साईप्रणितच्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. 

-जागतिक स्पर्धेत गिटिंग यालाच हरवून त्याने ब्रॉंझपदकापर्यंत मजल मारली होती.

चॅंगझोऊ (चीन) - भारताच्या बी. साईप्रणित याला तीन गेमच्या संगर्षपूर्ण लढतीनंतर चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ऍन्थोनी सिनिसुका गिंटींगकडून पराभव पत्करावा लागला. साईप्रणितच्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. 
जागतिक स्पर्धेत गिटिंग यालाच हरवून त्याने ब्रॉंझपदकापर्यंत मजल मारली होती. जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर असणाऱ्या त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आज पराभव पत्करावा लागला. पहिली गेम जिंकल्यानंतर साईप्रणितने लढत 21-16, 6-21, 16-21 अशी गमावली. गिंटिंगची गाठ आता आठव्या मानांकित आंद्रेस ऍन्टोन्सेनशी पडणार आहे. 
साईप्रणितने पहिल्या गेमला 3-2 अशी सुरवात केली होती. ही आघाडी कायम ठेवत त्याने गेमच्या मध्याला 11-3 अशी आघाडी भक्कम केली. त्यानंतर गिंटिंगने प्रतिकार करताना 14-11 अशी आघाडी कमी केली. मात्र, साईप्रणितने फारसा वेळ न घेता पहिली गेम जिंकली. दुसऱ्या गेमला गिंटिंगने सलग सहा गुण मिळवत 9-4 अशी आघाडी मध्याला 11-5 वाढवली. या वेळी गिंटिंगचा खेळ इतका वेगवान होता की त्याने 18-6 अशी आघाडी घेत साईप्रणितला साफ निष्प्रभ केले. 
तिसऱ्या निर्णायक गेमला साईप्रणितने 2-6 अशा पिछाडीनंतर गिंटिंगला 11-7 असे मागे टाकले. या वेळी पुन्हा एकदा सलग सहा गुणांची कमाई करत गिंटिंगने 13-12 अशी आघाडी फिरवली. पुढे साईप्रणितला केवळ चारच गुण घेता आले. चार मॅच पॉइंट मिळवून गिंटिंगने विजय साकार केला. 


​ ​

संबंधित बातम्या