Pro Kabaddi 2019 : वॉरियर्स पडले पलटणवर भारी; बंगालचा मोठा विजय

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 29 July 2019

वरळीतील वल्लभाई स्टेडियमवर पुण्याचा तीन दिवसांतला हा दुसरा पराभव आहे. कबड्डीचा ऑलटाईम सुपस्टार अनुप कुमारच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या मोसमात मैदानात उतरणाऱ्या पुणेरी पलटणला दुखापतग्रस्त नितीन तोमरची अनुपस्थिती चांगलीच जाणवत आहे.

मुंबई : महाराष्ट्र डर्बी असो वा बंगालचे वॉरियर्स प्रतिस्पर्धी असो पुण्याचे पराभवाचे शुक्लकाष्ट संपायचे नाव घेईना. प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात तीन सामने त्यांना गमवावे लागले आहेत. आज बंगालने पुण्याचा 43-23  असा पराभव केला.

वरळीतील वल्लभाई स्टेडियमवर पुण्याचा तीन दिवसांतला हा दुसरा पराभव आहे. कबड्डीचा ऑलटाईम सुपस्टार अनुप कुमारच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या मोसमात मैदानात उतरणाऱ्या पुणेरी पलटणला दुखापतग्रस्त नितीन तोमरची अनुपस्थिती चांगलीच जाणवत आहे. त्यातच कर्णधार सुरजित आणि गिरीश इरनाक हे मातब्बर बचावपटू पकडींमध्ये सोप्या चुका करत आहेत त्यामळे आजच्या सामन्यात पूर्वार्धात 9-18 अशी पिछाडी त्यांचे खचलेले मनोबल सिद्ध करत होती.

उत्तरार्धात पाच मिनिटांत दोन लोण स्वीकारल्यानंतर अनुप कुमारने एकही गुण न मिळवणाऱ्या कर्णधार सुरजितला राखीव खेळाडू करून संघाबाहेर ठेवले त्यावेळी पुणे 11-34 असे पिछाडीवर होते. बंगालकडून कर्णधार मनिंदर सिंगने  14 गुणांची कामगिरी केली इराणच्या महम्मद नबीबक्षकने  सात गुणांसह त्याला चांगली साथ दिली.

प्रदीप नरवाल अपयशी
आज झालेल्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेटस् ने तमिळ थलैवाचा 24-23  असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. प्रो कबड्डीत  सर्वाधिक गुणांचा विक्रम करणारा सुपरस्टार चढाईपटू प्रदीप नरवालला या सामन्यात अवघा एकच गुण मिळवता आला. 13 चढायांच्या त्याच्या सहा पकडी झाल्या. तमिळकडून राहुल चौधरी आणि मनजित चिल्लर यांनी केलेले प्रयत्न एका गुणाने कमी पडले.


​ ​

संबंधित बातम्या