प्रो कबड्डी - यू मुम्बा संघाचा प्ले ऑफमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

- फझल अत्राचलीच्या भक्कम बचावात्मक खेळाच्या जोरावर यू मुम्बाने प्रो कबड्डी स्पर्धेत पाटणा पायरेटस्‌ला 30-26 असे पराजित केले आणि स्पर्धेच्या प्ले ऑफमधील प्रवेश निश्‍चित केला. 

- दुसऱ्या सामन्यात हरियाना स्टीलर्सची आगेकूच बंगळूर बुल्सने 59-36 अशी रोखली. या विजयाने बंगळूर संघानेही  प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला

- बंगळूरच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या 59 गुणांपैकी 39 गुण चढाईतील होते आणि ते सर्व पवनकुमारने मिळविले. त्याने एका सामन्यात 34 गुण मिळविण्याचा प्रदीप नरवालचा विक्रम मागे टाकला

पंचकुला - फझल अत्राचलीच्या भक्कम बचावात्मक खेळाच्या जोरावर यू मुम्बाने प्रो कबड्डी स्पर्धेत पाटणा पायरेटस्‌ला 30-26 असे पराजित केले आणि स्पर्धेच्या प्ले ऑफमधील प्रवेश निश्‍चित केला. 
मुंबईने पाटणाचा अव्वल आक्रमक प्रदीप नरवालची कोंडी केली. मुंबईच्या बचावाने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमकता दाखवली. सामन्यातील पहिल्याच चढाईत फाझलने प्रदीपची पकड केली. त्यानंतर अभिषेक सिंग आणि अतुलने चांगले आक्रमण करीत मुंबईला नऊ गुणांची आघाडी दिली. 
पाटणाने सहज हार मानली नाही. प्रदीप नरवालने चढाईत गुण घेत विश्रांतीस मुंबईची आघाडी पाच गुणांवर नेली. उत्तरार्धात प्रदीपची सुपर टॅकल करीत मुंबईने आघाडी भक्कम केली. प्रदीप मैदानावर नव्हता, पण इस्माईल मॅगसोदौलोओचे अष्टपैलूत्व आणि यांग कुन लीच्या चढायांनी पाटणाच्या आशा कायम ठेवल्या. पाटणाची पिछाडी एका गुणाची असताना रोहित बलियानच्या किकने मुंबईला ताकद दिली आणि त्यानंतर मुंबईने विजय निसटू दिला नाही. 

बंगळूरही प्ले-ऑफमध्ये 
दुसऱ्या सामन्यात हरियाना स्टीलर्सची आगेकूच बंगळूर बुल्सने 59-36 अशी रोखली. या विजयाने बंगळूर संघानेही  प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. प्ले-ऑफ प्रवेश निश्‍चित करणारा बंगळूर पाचवा संघ ठरला. बंगळूरच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या 59 गुणांपैकी 39 गुण चढाईतील होते आणि ते सर्व पवनकुमारने मिळविले. त्याने एका सामन्यात 34 गुण मिळविण्याचा प्रदीप नरवालचा विक्रम मागे टाकला. हरियानाकडून प्रशांत कुमार रायने आज सुपर टेन कामगिरी केली. 
बंगळूरने प्रो-कबड्डीच्या इतिहासात हरियानाविरुद्धच्या चार लढतीत दुसराच विजय मिळविला. यातील एक विजय यंदाच्या मोसमातील आहे. 


​ ​

संबंधित बातम्या