किशोरी गटात पुण्याला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 September 2019

-किशोर-किशोरी गटाच्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत पुणे संघाचे दुहेरी विजेतेपदाचे स्वप्न भंग पावले.

-किशोर गटात उस्मानाबाद संघाने पुणे संघाचा 13-12 असा पाच मिनिट आणि एका गुणाने पराभव केला.

-किशोरी गटात मात्र पुण्याच्या मुलींनी बाजी मारली. त्यांनी अंतिम फेरीत नाशिकचा 11-10 असा पाच मिनिट आणि एकाच गुणाने पराभव केला. 

-रमेश वसावे (उस्मानाबाद), भाग्यश्री बडे (पुणे)  सर्वाेत्कृष्ट खेळाडू

धुळे - किशोर-किशोरी गटाच्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत पुणे संघाचे दुहेरी विजेतेपदाचे स्वप्न भंग पावले. किशोर गटात उस्मानाबाद संघाने पुणे संघाचा 13-12 असा पाच मिनिट आणि एका गुणाने पराभव केला. किशोरी गटात मात्र पुण्याच्या मुलींनी बाजी मारली. त्यांनी अंतिम फेरीत नाशिकचा 11-10 असा पाच मिनिट आणि एकाच गुणाने पराभव केला. 
येथील गरुड मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलांच्या गटात उस्मानाबाद संघाचा बचाव निर्णायक ठरला. त्यांच्याकडून भरतसिंग वसावे याने 2.30 आणि 2 मिनिटे बचाव केला. त्यांच्या विजयात रमेश वसावे याची अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली. त्याने दोन्ही डावांत 1.20 मिनिटे बचाव केला आणि आक्रमणात चार गडी टिपले. रवी वसावे यानेही अष्टपैलू चमक दाखवताना 1 मिनिट आणि 1.50 मिनिटे बचाव केला, तर दोन गडीही बाद केले. पुणे संगाकडून सागर साकर याने 1.50 मिनिटे बचाव केला. चेतन बिकाने तीन गडी बाद केले. रोशन कोळीने दोन्ही डावात 1 मिनिट आणि 1.30 मिनिटे बाजू लढवली. पण, त्यांची लढत अपुरी ठरली. 
किशोरी गटात भाग्यश्री बडे हिची अष्टपैलू कामगिरी पुणे संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. तिने दोन्ही डावात अनुक्रमे 1.10 मिनिटे आणि 1.20 मिनिटे बचाव केला. तिचे आक्रमणही धारदार राहिले. तिने चार गडी बाद केले. तिला प्रांजली शेडगे हिची भक्कम साथ मिळाली. तिने 1.40 आणि 2.10 मिनिटे बचाव करून पुण्याचा बचाव भक्कम राखला. दिक्षा चितळे, प्रेरणा कांबळे यांचाही खेळ उल्लेखनीय ठरला. नाशिककडून ज्योती मेढे हिची (1.40 आणि 1.20 मिनिटे) लढत एकाकी ठरली. ललिता गोबाले आणि दिदी ठाकरे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. 
--------------- 
वैयक्तिक पारितोषिके 
संरक्षक ः भरतसिंग वसावे (उस्मानाबाद), प्रांजली शेडगे (पुणे) 
आक्रमक ः चेतन बिका (पुणे), ललिता गोबाले (नाशिक) 
अष्टपैलू ः रमेश वसावे (उस्मानाबाद), भाग्यश्री बडे (पुणे) 


​ ​

संबंधित बातम्या