प्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 December 2018

पुणे -  ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) आणि पुण्याच्या धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. पुरुषांची शर्यत प्रदीप सिंगने जिंकताना १ तास ६ मिनिटे १० सेकंद, तर मनीषाने १ तास २२.२३ सेकंद अशी वेळ दिली.

पुणे -  ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) आणि पुण्याच्या धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. पुरुषांची शर्यत प्रदीप सिंगने जिंकताना १ तास ६ मिनिटे १० सेकंद, तर मनीषाने १ तास २२.२३ सेकंद अशी वेळ दिली.

धावण्याच्या कुठल्याही शर्यतीला हवे हवेसे असे थंड वातावरण, खेळाडूंमध्ये दिसून  आलेला अमाप उत्साह आणि त्याला पुणेकरांनी दिलेली भरभरून दाद हे पहिल्या अर्ध मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणता येईल. एरवी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सकाळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या वर्दळीमुळे विद्यापीठ, बाणेर परिसरातील रस्त्यांना अर्धवट जाग असते. पण, आज या रस्त्यावरून एका बाजूने मॉर्निंग वॉक आणि मधून लयबद्ध धाव घेणाऱ्या धावपटूंमुळे रस्ते नुसते पूर्ण जागेच झाले नव्हते, तर जणू त्यांनाही वेग आला होता. 

शर्यतीला म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातून पहाटे बरोबर ५.१५ वाजता सुरवात झाली. स्टेडियममधून बाहेर पडतानाच एएसआयच्या धावपटूंनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत सोडली नव्हती. रोजचा सराव आणि लांब पल्ल्याच्या शर्यतीत धावण्याचा असलेला अनुभव त्यांच्या लयबद्ध धावण्यावरून दिसून येत होता. अर्धा किलोमीटरच्या अंतरात महत्त्वाच्या असणाऱ्या ५, १०, १५ अशा प्रत्येक टप्प्यात हे धावपटू एकत्रच होते. शर्यत परतीच्या मार्गावरून शर्यत क्रीडा संकुलात शिरत असतानाच या खेळाडूंमध्ये अंतर पडले आणि प्रदीपने सर्व प्रथम अंतिम रेषा गाठली. अनुकूल वातावरणात सर्वोत्तम वेळ देण्यात अपयश आल्याची खंत तिन्ही धावपटूंना होती. पण, एका साध्या, सरळ शर्यतीचा अनुभव खूप मोलाचा होता, अशीच भावना प्रत्येकाची होती.

मनीषाची बाजी
पुरुषांप्रमाणे महिलांच्या शर्यतीत वेगळा अनुभव नव्हता. अनुभवाला कौशल्याची जोड देत रेल्वेच्या सेवेत असणाऱ्या पुण्याच्या मनीषा साळुंके हिने बाजी मारली. तिने १ तास २२ मिनिटे २३ सेकंद वेळ दिली. सरळ सोपा मार्ग असला, तरी आव्हानात्मक होता, अशी प्रतिक्रिया मनीषाने दिली. ती म्हणाली, ‘‘हवामान नक्कीच पूरक होते. मार्गही चांगला होता. त्यामुळे सर्वोत्तम वेळेची अपेक्षा होती. मात्र, सरावातच कमी पडल्याने मला यात अपयश आले. अर्ध मॅरेथॉन शर्यतीचा अनुभव पुरेसा आला आहे. आता माझे लक्ष पूर्ण मॅरेथॉनकडे आहे. स्पर्धेच्या अचूक नियोजनामुळे शर्यत खऱ्या अर्थान संस्मरणीय झाली.’’ महिलांच्या शर्यतीत उत्तराखंडच्या सिंधू यादव हिने पुण्याच्या धावपटूंना आव्हान दिले. मात्र, तिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मात्र, तिला मनीषाला गाठणे जमले नाही. अखेरच्या टप्प्यात मनीषाने मारलेली मुसंडी निर्णायक ठरली. मनीषाने वेग वाढवल्यावर सिंधूला तिला गाठणे जमले नाही. सिंधूने १ तास २३ मिनिटे ४६ सेकंद अशी वेळ देत अंतिम रेषा गाठली. नागपूरच्या मोनिका राऊत (१ तास २३ मिनिट ५७ सेकंद) तिसरी आली.

एएसआयचे प्रमुख धावपटू शर्यतीत नसले, तरी त्यांची दुसरी फळी तितकीच ताकदवान बनत असल्याचेच या धावपटूंच्या कामगिरीवरून दिसून आले. खेळाची कुठलीही पार्श्‍वभूमी नसताना केवळ लष्करात दाखल झाल्यापासून धावण्याचे वेड लागलेल्या प्रदीपने आतापर्यंत दिल्ली, मुंबई, पुणे अशा विविध शर्यतीतून आपले कौशल्य दाखवून दिले आहे. स्पर्धकांकडून अधिक आव्हान मिळाले असते,  तर अधिक चांगली वेळ देता आली असते.
- प्रदीप सिंग, (२१ कि.मी.चा विजेता)

खास या स्पर्धेसाठी आले होते. २०१५ पासून मी सराव करते. वातावरण खूप छान होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळेल अशी अपेक्षा होती. माझी यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी १ तास १९ मिनिटे इतकी होती. दुखापतीमधून बाहेर आल्यावर ही माझी पहिली अर्धमॅरेथॉन. आजच्या वेळेवर मी समाधानी आहे. आता, मथुरा येथील २० जानेवारीच्या खुल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत कामगिरी उंचाविण्याचा माझा प्रयत्न राहील. माझे यश मी प्रशिक्षक विजय प्रताप सिंग यांना अर्पण करते.
- सिंधू यादव (२१ कि.मी. उपविजेती)

सरावाच्या तुलनेत चांगले धावले. मार्गही व्यवस्थित असल्याने थकवा जाणविला नाही. चेक रिपब्लिक येथील वर्ल्ड रेल्वे मॅरेथॉनमध्ये धावले होते. त्याच्या त्रासामधून अजून पूर्ण सावरलेली नाही. त्याचा कामगिरीवर परिणाम झाला असे म्हणता येणार नाही. चांगली वेळ देता आली असती. पुढील वेळेस मी नक्कीच सुधारणा करेन. माझी आई सुलोचना, वडील फुलचंद आणि प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना मी माझ्या यशाचे श्रेय देते.
- मोनिका राऊत (२१ कि.मी. तिसरी)

वेगळा अनुभव - मानसिंग
प्रदीपचाच सहकारी, पण अनुभवात त्याच्या एक पाऊल पुढे असणाऱ्या मानसिंगला केवळ ३३ सेकंदांनी दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मानसिंगने या वर्षी बंगळूर १० कि.मी. शर्यतीत विजेतेपद मिळविले आहे. वसई-विरार अर्ध मॅरेथॉनही २०१५ मध्ये त्याने जिंकली आहे. दिल्लीत २०१६ मध्ये तो तिसरा आला होता. या सगळ्या शर्यतीत आलेला आणि आजचा अनुभव खूप वेगळा होता, असे सांगून मानसिंग म्हणाला, ‘‘थंड हवामानामुळे चांगली वेळ मिळणार याची खात्री होती. विजेतेपदाच्या इराद्यानेच उतरलो होतो. पण, यश आले नाही. विजेतेपद हुकले याचे दुःख आहेच. पण, एका चांगल्या शर्यतीचा आणि अचूक नियोजनाचा अनुभव मला भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरेल.’’

गावाकडून लष्करापर्यंत - प्रल्हाद धनावत
पुरुषांच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला औरंगाबादचा प्रल्हाद धनावतचा अनुभव पहिल्या दोघांपेक्षा वेगळा होता. पूरक वातावरण, योग्य मार्ग आणि अचूक नियोजनाबरोबरच पुणेकरांचे मिळणारे प्रेम मोठे असते, असे तो म्हणाला. तो पुढे म्हणाला, ‘‘पुण्याचे लोक क्रीडाप्रेमी आहेत. ते नेहमीच खेळाडूंवर प्रेम करतात. त्यांना भरभरून प्रोत्साहन देतात. त्यामुळे येथे कामगिरी करायला नेहमीच आवडते.’’ आपल्याला धावपटू बनवण्यात लष्कराचा मोठा वाटा आहे, असे तो मानतो. तो म्हणाला, ‘‘गावाकडे आलेल्या दुष्काळाच्या झळा कुटुंबाला पसंत होत्या. त्यामुळे लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. लष्कराला २०१२ मध्ये दाखल झाल्यापासून दोन वर्षांत धावायला सुरवात केली आणि मग धावण्याचाच ध्यास लागला. अमरावती, जबलपूर अशा अर्ध मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळविल्यावर जयपूरमध्ये १ तास ५ मिनिटे ३० सेकंद अशी सर्वोत्तम वेळ देताना तिसरा क्रमांक मिळविला. प्रशिक्षक सुभेदार के. सी. रामू यांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला.’’


​ ​

संबंधित बातम्या