पलटणच्या बचावाने बंगळूरला हरवले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 September 2019

-प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात पुणेरी पलटण संघाने घरच्या मैदनावरील सांगता विजयाने करताना शुक्रवारी बंगळूर बुल्स संघाचा 42-38 असा पराभव केला. 

-पुणे संघाने केलेल्या एकूण 40 चढायांपैकी पंकज एकट्याने 28 चढाया करताना 17 गुण मिळविले

-बंगळूर संघाकडून रोहित कुमार आणि पवन शेरावत यांनी सुपर टेन करताना अनुक्रमे 14 आणि 12 गुणांची कमाई केली

पुणे - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात पुणेरी पलटण संघाने घरच्या मैदनावरील सांगता विजयाने करताना शुक्रवारी बंगळूर बुल्स संघाचा 42-38 असा पराभव केला. 
पुणे संघाच्या विजयात पंकज मोहितेच्या चढाईतील 17 गुणांचा जेवढा वाटा महत्वाचा होता, त्याहीपेक्षा अधिक वाटा त्यांच्या सुरजित आणि सागर कृष्णा यांच्या भक्कम बचावाचा होता. या दोघांच्या बचावाने बंगळूरच्या पवन शेरावतची कोंडी केली आणि पुणे संघाचा विजय सुकर केला. सागर आणि सुरजित दोघांनी हाय फाईव्ह करताना अनुक्रमे 7 आणि सहा गुणांची कमाई केली. यात सागरच्या तीन सुपर टॅकलचा समावेश होता. मोसमात "सुपर टॅकल'च्या यशाची टक्केवारी पुणे संघाने आज आणखी वाढवली. 
सागर आणि सुरजितने बंगळूरच्या आक्रमणाला लगाम लावल्यावर बचाव खिळखिळा करण्याचे काम पंकजच्या चढायांनी सुरेख केले. पुणे संघाने केलेल्या एकूण 40 चढायांपैकी पंकज एकट्याने 28 चढाया करताना 17 गुण मिळविले. पुण्याकडून अन्य 12 चढाया दर्शन काडियान आणि मनजीतने केल्या. यात मनजीतला एकही गुण मिळाला नाही, तर दर्शनने एका गुणाची कमाई केली. 
बंगळूर संघाकडून रोहित कुमार आणि पवन शेरावत यांनी सुपर टेन करताना अनुक्रमे 14 आणि 12 गुणांची कमाई केली. पण, दोन लोण आणि बचावात झालेल्या चुका त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. चढाईत 29-18 असे वर्चस्व बंगळूरचे राहिले असले, तरी बचावातील 17-7 हा दहा गुणांचा फरकच पलटणच्या बचावाचे महत्व वाढवणारा ठरला. 
पाटणा-तेलुगू बरोबरी 
त्यापूर्वी, झालेल्या सामन्यात पाटणा पायरेट्‌सने आपले आव्हान कायम राखताना तेलुगू टायटन्सला 42-42 असे बरोबरीत रोखले. प्रदीप नरवाल आणि जॅंग कुन ली यांच्या चढायांना हादीकडून मिळालेली बचावातील साथ महत्वाची ठरली. तेलुगूकडून सिद्धार्त देसाई याने 12 गुणांची कमाई करताना सातत्य ठेवले. या वेळी त्यांच्याकडून रजनीशने प्रथमच सुपर टेन करताना आपली छाप पाडली. मात्र, ते आपली झुंज यशस्वी करू शकले नाहीत. 


​ ​

संबंधित बातम्या