इंडोनेशियन बॅडमिंटन : भारताच्या सिंधू, श्रीकांतची आगेकूच 

वृत्तसंस्था
Wednesday, 17 July 2019

भारताच्या किदांबी श्रीकांत आणि पी. व्ही सिंधू यांनी इंडोनेशियन बॅडमिंटन स्पर्धेत आपली आगेकूच सुरू केली. त्याचवेळी बी. साई प्रणित याचे आव्हान मात्र संपुष्टात आले. 

जकार्ता : भारताच्या किदांबी श्रीकांत आणि पी. व्ही सिंधू यांनी इंडोनेशियन बॅडमिंटन स्पर्धेत आपली आगेकूच सुरू केली. त्याचवेळी बी. साई प्रणित याचे आव्हान मात्र संपुष्टात आले. 

श्रीकांतला पहिल्या फेरीतील विजयासाठी 46 मिनिटे पुरी पडली. त्याने जपानच्या केंटा निशिमोटो याचे आव्हान 21-14,21-13 असे संपुष्टात आणले. सिंधूला मात्र पहिल्या फेरीतील विजयासाठी तीन गेमची वाट पहावी लागली. जपानच्या आया ओहोरी हिने तिला झुंजवले. पहिली गेम गमाविल्यानंतर सिंधूने लढत 11-21, 21-15, 21-15 अशी जिंकली. ही लढत एक तास चालली. 

गेल्यावर्षी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये विजेतेपद मिळविल्यापासून सिंधू अजून विजेतेपदाच्या शोधात आहे. या वर्षी सिंधूला एकाही स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आलेली नाही. एका महिन्याच्या विश्रांतीनंतर सिंधूने पुनरागमन केले आहे. 

पहिल्या फेरीच्या लढतीत साई प्रणितला हॉंग कॉंगच्या वोंग विंग की व्हिन्सेंट याच्याकडून 15-21, 21-13, 10-21 असा पराभव पत्करावा लागला. साई प्रणितने पहिली गेम गमाविल्यानंतर दुसऱ्या गेमला खेळामध्ये सुधारणा करत विजय मिळविला होता. पण, तिसऱ्या गेमला साई प्रणित आपल्यापेक्षा कमी मानांकन असलेल्या व्हिन्सेटविरुद्ध सातत्य राखू शकला नाही आणि त्याला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मिश्र दुहेरीत सत्विकसाईराज रंकीरेड्डी-अश्‍विनी पोनप्पा यांना पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या टोन्टोवी अहमद-विनी ओकाटविना कांडोव जोडीकडून 13-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला.


​ ​

संबंधित बातम्या