डेन्मार्क बॅडमिंटन - सिंधू, साई प्रणीतचा विजय

वृत्तसंस्था
Wednesday, 16 October 2019

-जगज्जेती पी. व्ही. सिंधू आणि बी. साई प्रणीत यांनी मंगळवारी डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या आपल्या मोहिमेस विजयी सुरवात केली

- सिंधूने एकतर्फी लढतीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्ता तुजुंग हिचे आव्हान 22-20, 21-18 असे संपुष्टात आले

- भारताचा बी. साई प्रणीत याने दिग्गज खेळाडू लिन डॅन याला 35 मिनिटांच्या लढतीनंतर 21-14, 21-17 असे पराभूत केले.

ओडेन्स (डेन्मार्क) - जगज्जेती पी. व्ही. सिंधू आणि बी. साई प्रणीत यांनी मंगळवारी डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या आपल्या मोहिमेस विजयी सुरवात केली. 
महिला एकेरीत पाचवे मानांकन असलेल्या सिंधूने एकतर्फी लढतीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्ता तुजुंग हिचे आव्हान 22-20, 21-18 असे संपुष्टात आले. सिंधूचा विजय सरळ दोन गेममध्ये असला, तरी या दोन्ही गेममध्ये तिला कुमार गटातील माजी जगज्जेती ग्रेगोरिया हिने चांगलेच झुंजवले. सिंधूची गाठ आता कोरियाच्या अन से यंग हिच्याशी पडणार आहे. 
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेता भारताचा बी. साई प्रणीत याने दिग्गज खेळाडू लिन डॅन याला 35 मिनिटांच्या लढतीनंतर 21-14, 21-17 असे पराभूत केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा माजी विजेती पी. कश्‍यप याला मात्र पहिल्या फेरीचा अडथळा दूर करता आला नाही. त्याला थायलंडच्या सिलिकोम थाम्मासिन याच्याकडून 13-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. सौरभ वर्मा याचेही आव्हान संपुष्टात आले. त्याला नेदरलॅंडच्या मार्क कालजी याने 21-19, 11-21, 17-21 असे पराभूत केले. 
पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने कोरियाच्या किम जी जुंग-ली योग डेई जोडीचा 24-22, 21-11 असा पराभव केला. 
कुठल्याही स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सिंधू नेहमी स्थिरावण्यासाठी वेळ घेते. या वेळी ती पहिल्या गेमला 13-16 अशी मागे होती. त्यानंतर अगदी अखेरच्या क्षणी तिला 19-20 असा एक गेम पॉइंटही वाचवावा लागला. मात्र, या वेळी सिंधूने सलग तीन गुण मिळवून पहिली गेम जिंकली. दुसऱ्या गेमलाही सिंधू प्रथम 6-9 आणि नंतर 16-17 अशी मागे होती. त्या वेळी मात्र सिंधूने मुसंडी मारली. सलग चार गुणांची कमाई करत तिने दुसऱ्या गेमसह विजय मिळविला. 


​ ​

संबंधित बातम्या