French Open 2019 : फ्रेंच विजेतेपदाची नदालची तपपूर्ती

वृत्तसंस्था
Monday, 10 June 2019

क्‍ले सम्राट राफेल नदालने फ्रेंच टेनिस स्पर्धेतील विजेतेपदांची तपपूर्ती करताना 18 वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपदही पटकावले. नदालने डॉमिनिक थिएम याचे चार सेटमधील कडवे आव्हान परतवत एकच स्पर्धा 12 वेळा जिंकलेला पहिला टेनिसपटू होण्याचा मान मिळवला.

पॅरिस : क्‍ले सम्राट राफेल नदालने फ्रेंच टेनिस स्पर्धेतील विजेतेपदांची तपपूर्ती करताना 18 वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपदही पटकावले. नदालने डॉमिनिक थिएम याचे चार सेटमधील कडवे आव्हान परतवत एकच स्पर्धा 12 वेळा जिंकलेला पहिला टेनिसपटू होण्याचा मान मिळवला. ही कामगिरी करताना त्याने मार्गारेट कोर्ट यांचा सर्वाधिक 11 वेळा ऑस्ट्रेलियन विजेतेपदे जिंकण्याचा विक्रम मोडला.

नदालने आपला क्‍ले कोर्टवरील सर्व अनुभव पणास लावत गुणफलक दाखवतो त्यापेक्षा जास्त खडतर झालेली लढत जिंकली. त्याने निर्णायक लढतीत 6-3, 5-7, 6-1, 6-1 अशी बाजी मारली. नदाल आणि सर्वाधिक ग्रॅंड स्लॅम विजेतेपद जिंकलेल्या फेडररमध्ये आता दोनच जेतेपदांचे अंतर आहे; तर त्याने या शर्यतीत आता नोवाक जोकोविकला तीन विजेतेपदांनी मागे टाकले.

डावखुऱ्या नदालने विजेतेपद जिंकल्यावर त्याच्या लाडक्‍या असलेल्या रोलॅं गॅरो कोर्टवर त्याने झोकून दिले. कोर्टची माती पाठीमागे लागली असतानाच त्याने कौतुक करणाऱ्या चाहत्यांची मानवंदना स्वीकारली.

जोकोविकचे एकाच वेळी चार ग्रॅंडस्लॅम विजेतेपद बाळगण्याचे स्वप्न संपवलेल्या थिएमने नदालचा कस पाहिला. त्याने सामन्यातील सर्व्हिस ब्रेकही नोंदवला. त्यानंतरही नदालने पहिला सेट जिंकला. दुसरा सेट गमावल्यावर नदाल जास्त आक्रमक झाला. त्याने तिसऱ्या सेटमधील पहिल्या 17 पैकी 16 गुण जिंकले होते. थिएमने चेंडू बाहेर मारल्यावर नदालने विजेतेपद जिंकले.


​ ​

संबंधित बातम्या