ऑलिंपिकपासून राहुल आवारे जागतिक पदकानंतरही दूरच

वृत्तसंस्था
Monday, 23 September 2019

-राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकले असले, तरी त्याला टोकियो ऑलिंपिकला मुकावे लागेल, अशीच चिन्हे आहेत.

-राहुलने 61 किलो गटात पदक जिंकले; पण त्यापेक्षा कमी असलेल्या म्हणजेच 57 किलो गटात रवी दहियाने; तर 61 पेक्षा जास्त असलेल्या 65 किलो गटात बजरंग पुनियाने ऑलिंपिक पात्रता मिळवली

-जागतिक स्पर्धेची निवड चाचणी झाली, त्या वेळी राहुल जखमी होता; त्यामुळे त्याला 57 किलो गटात खेळता आले नव्हते.

मुंबई - राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकले असले, तरी त्याला टोकियो ऑलिंपिकला मुकावे लागेल, अशीच चिन्हे आहेत. ऑलिंपिकमध्ये असलेल्या 61 किलो गटात राहुलने पदक जिंकले; पण त्याच्या आसपासच्या दोन्ही वजनी गटात भारतीय कुस्तीगीरांनी पात्रता मिळवल्याने राहुलचे ऑलिंपिक हुकण्याचीच शक्‍यता आहे. 
राहुलने 61 किलो गटात पदक जिंकले; पण त्यापेक्षा कमी असलेल्या म्हणजेच 57 किलो गटात रवी दहियाने; तर 61 पेक्षा जास्त असलेल्या 65 किलो गटात बजरंग पुनियाने ऑलिंपिक पात्रता मिळवली आहे. त्याचबरोबर रवी आणि बजरंगनेही ब्रॉंझ जिंकले आहे. त्यामुळे त्यांचे ऑलिंपिक तिकीट निश्‍चित आहे. 
ऑलिंपिक पात्रता मिळवणाराच कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी जाईल हा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे. जागतिक कुस्तीत विनेश फोगटने ब्रॉंझसह ऑलिंपिक पात्रता मिळवली, त्या वेळी भारतीय मार्गदर्शकांनी रेसलिंग टीव्ही या जागतिक महासंघाच्या दूरचित्रवाणीस मुलाखत दिली होती. त्या वेळी भारतात ऑलिंपिक पात्रता मिळवणारा कुस्तीगीरच ऑलिंपिकसाठी जातो, हे स्पष्ट केले होते. 
जागतिक स्पर्धेची निवड चाचणी झाली, त्या वेळी राहुल जखमी होता; त्यामुळे त्याला 57 किलो गटात खेळता आले नव्हते. जागतिक स्पर्धेचा अनुभव मिळवण्यासाठी राहुलने वजन वाढवले. त्या वेळी आवश्‍यकता भासल्यास परत 57 किलो गटात येता येईल असा विचार होता. त्यावेळी रवी 61 किलो गटात खेळणार नाही, अशीही काहीशी अपेक्षा होती, पण रवीच्या पात्रतेमुळे राहुलच्या टोकियो ऑलिंपिक खेळण्याच्या आशा जवळपास संपुष्टातच आल्या आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या