IPL 2019 : आर्चर, स्टोक्‍सच्या गैरहजेरीत राजस्थानला कडवे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 April 2019

आयपीएल : बंगळूर : आयपीएलच्या 12व्या पर्वात बाद फेरी गाठण्याच्या राजस्थान रॉयल्सला कागदावर अजूनही आशा आहेत. मंगळवारी त्यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध लढत होत आहे. त्यात राजस्थानला विजय अनिवार्य असेल. दुसरीकडे आरसीबी संघसुद्धा आव्हान संपुष्टात आले असले तरी घरच्या मैदानावर जिंकून चाहत्यांना थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न करेल. 

आयपीएल : बंगळूर : आयपीएलच्या 12व्या पर्वात बाद फेरी गाठण्याच्या राजस्थान रॉयल्सला कागदावर अजूनही आशा आहेत. मंगळवारी त्यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध लढत होत आहे. त्यात राजस्थानला विजय अनिवार्य असेल. दुसरीकडे आरसीबी संघसुद्धा आव्हान संपुष्टात आले असले तरी घरच्या मैदानावर जिंकून चाहत्यांना थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न करेल. 

पहिले सहा सामने गमावल्यानंतर विराट कोहलीच्या संघाने विजय मिळविला; पण त्यांची गाडी पुन्हा घसरली. रविवारी दिल्लीविरुद्धच्या पराभवासह त्यांच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या. 
राजस्थानचे 12 सामन्यांतून 10 गुण आहेत. उरलेले दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील. त्याचवेळी गुणतक्‍त्यात आघाडीवर असलेल्या दिल्ली, मुंबई, चेन्नई अशा संघांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना हरविणे राजस्थानसाठी आवश्‍यक आहे. 

राजस्थानसमोरील आव्हान मात्र सोपे नाही. याचे कारण जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्‍स हे इंग्लंडचे खेळाडू परतले आहेत. त्यातही आर्चरची उणीव जास्त जाणवेल. त्याने केकेआरविरुद्ध अंतिम टप्यात 12 चेंडूंत फटकावलेल्या 27 धावा निर्णायक ठरल्या होत्या. इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलर हा यापूर्वीच मायदेशी परतला आहे. त्याने तीन अर्धशतकांसह 311 धावांचे योगदान दिले. 

राजस्थानने मुंबई आणि केकेआर यांना हरवून आशा कायम राखल्या. ईडन गार्डन्सवरील विजयामुळे संघात जान आली आहे. यात रियान पराग याची नाट्यमय खेळी निर्णायक ठरली. राजस्थानला यानंतरही खेळातील काही त्रुटी दूर करण्याची गरज आहे. मोक्‍याच्या क्षणी पकड भक्कम करण्यात त्यांना यश मिळत नाही. त्यामुळेच पंजाब, हैदराबाद आणि चेन्नईविरुद्ध त्यांचा पराभव झाला. 

गोपाल बलस्थान 
लेगब्रेक गोलंदाज श्रेयस गोपाल राजस्थानचे बलस्थान ठरला आहे. त्याने विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शिम्रॉन हेटमायर अशा फटकेबाज फलंदाजांना चकविले आहे. यंदा पहिले शतक फटकावलेल्या संजू सॅमसन याचा फॉर्मसुद्धा आश्‍वासक आहे. 

नेतृत्वबदल फलदायी 
राजस्थान रॉयल्सने मोसमाच्या मध्येच केलेला नेतृत्वबदल फलदायी ठरला आहे, त्यामुळे अजिंक्‍य रहाणे फॉर्मात आला, तर संघालाही विजयाचा मार्ग गवसला. रहाणेने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शतक ठोकले. हा सामना राजस्थानने गमावला तरी रहाणेची खेळी बहुमोल ठरली. 
 


​ ​

संबंधित बातम्या