World Cup 2019 : आयसीसीनेच सांगितलंय, सहज पडणार नाहीत अशाच बेल्स बनवा

वृत्तसंस्था
Friday, 14 June 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक चर्चा कशाची होत आहे, तर ती "झिंग' बेल्सची. ट्रेंट बोल्ट, मिशेल स्टार्क, बेन स्टोक्‍स आणि जसप्रीत बुमरा यांच्या कितीही वेगवान चेंडूने स्पर्श केला तरी या बेल्स काही पडायला तयार नाहीत.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक चर्चा कशाची होत आहे, तर ती "झिंग' बेल्सची. ट्रेंट बोल्ट, मिशेल स्टार्क, बेन स्टोक्‍स आणि जसप्रीत बुमरा यांच्या कितीही वेगवान चेंडूने स्पर्श केला तरी या बेल्स काही पडायला तयार नाहीत. त्यामुळे फलंदाज नाही, तर गोलंदाजच बाद होत आहेत. अशा वेळी या बेल्स उत्पादक कंपनीने आम्हीच हैराण झालो आहोत. मात्र, बेल्स सहजी पडू नयेत अशीदेखील विनंती होती, असे म्हटले आहे. 

या संदर्भात आयसीसीने फारसे स्पष्टीकरण दिले नसले, तरी झिंग्स कंपनीचे संचालक डेव्हिड लिगर्टवूड यांनी चक्रावून गेलो असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ""वेगवान चेंडू लागूनही बेल्स पडत नाहीत याला केवळ त्यांचे वजन नाही, तर अन्य कारणेही आहेत. पण, जे काही बघत आहोत त्याने आम्ही हैराण झालो आहोत. बेल्स सहज पडू नयेत अशी मागणी होती; पण सध्या होणारी टीका लक्षात घेता आम्ही भविष्यात बेल्सच्या उत्पादनात नक्कीच सुधारणा करू.'' 

बेल्सच्या वजनाचा मुद्दा आला तेव्हा ते म्हणाले, "केवळ वजन अधिक आहे म्हणून नाही, तर अन्य काही कारणाने या बेल्स पडत नसाव्यात. यात बेल्स बसविण्याची खाच, खेळपट्टीचे स्वरूप, यष्ट्यांमध्ये बसविण्यात आलेले कॅमेरे अशी अन्य कारणे असू शकतात.'' पण, याचे स्पष्टीकरण त्यांना देता आले नाही. 

आपल्या उत्पादनाचे समर्थन करताना लिगर्टवूड म्हणाले, "बेल्सचे वजन अधिक असल्याचे सातत्याने बोलले जात आहे, यात तथ्य नाही. मुळात बेल्स सहज पडणार नाहीत अशीच मागणी होती. यापूर्वी वेगवान चेंडू बेल्सच्या जवळून गेला तरी बेल्स पडत होत्या, जोराचे वारे वाहू लागल्यावरही बेल्स पडत होत्या, त्यामुळे खेळात व्यत्यय येत होता. पंचांना सारखे जागा सोडून बेल्स लावण्यासाठी पळावे लागत होते. हलक्‍या बेल्स वेगवान चेंडू लागून तुटण्याचीदेखील भीती होती, त्यामुळे बेल्सचे वजन वाढविण्याची मागणी होती. त्यानुसारच आम्ही बेल्स तयार केल्या. अनेक सामन्यांत त्यांचा वापर झाला. पण, प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणावर आम्हाला तक्रारी येत आहेत. आम्ही विश्‍वकरंडक स्पर्धेतील अशा घटनांकडे बारकाईने पहात आहोत. आवश्‍यक वाटल्यास बेल्सच्या निर्मितीत बदल करू.''  

स्टम्प, बेल्सचा खर्च 50 लाख 
विश्‍वकरंडक स्पर्धेत वापरण्यात येणारे एलईडी स्टम्प आणि बेल्सच्या वापरासाठी "आयसीसी'ला मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. स्पर्धेत वापरण्यात येणाऱ्या स्टम्पसाठी 24 लाख रुपये आणि बेल्सच्या जोडीसाठी 50 हजार रुपये खर्च येतो. प्रत्येक सामन्यासाठी स्टम्प आणि बेल्सच्या दोन जोडी लागतात. म्हणजे स्टम्प आणि बेल्ससाठी प्रत्येक सामन्याला "आयसीसी'ला 50 लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. 
 


​ ​

संबंधित बातम्या