वेगवान गोलंदाज, फलंदाजांनी साकारला ऑस्ट्रेलियाचा विजय

वृत्तसंस्था
Friday, 8 November 2019

- ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध तिसरा सामना दहा गडी आणि 49 चेंडू राखून जिंकताना मालिकेत 2-0 असे यश मिळविले

- केन रिचर्डसन, मिशेल स्टार्क आणि सीन ऍबॉट या वेगवान गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे फलंदाज टिकूच शकले नाहीत

पर्थ - वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळविले. त्यांनी तिसरा सामना दहा गडी आणि 49 चेंडू राखून जिंकताना मालिकेत 2-0 असे यश मिळविले. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. 
प्रथम फलंदाजी करताना दोन नव्या खेळाडूंसह खेळणाऱ्या पाकिस्तानचा डाव 8 बाद 106 असा मर्यादित राहिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 11.5 षटकांत बिनबाद 109 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच या आक्रमक जोडीने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला फारसे प्रयास पडले नाहीत. वॉर्नरने 35 चेंडूंत 48 आणि फिंचने 35 चेंडूंत 52 धावांचे नाबाद योगदान दिले. 
त्यापूर्वी, पाकिस्तानने आजच्या सामन्यात खुशदील शाह आणि महंमद मुसा यांना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली. मात्र, दोघांना प्रभाव पाडता आला नाही. केन रिचर्डसन, मिशेल स्टार्क आणि सीन ऍबॉट या वेगवान गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे फलंदाज टिकूच शकले नाहीत. इफ्तिकार अहमद 45 आणि इमाम उल हक 14 या दोघांनाच दुहेरी मजल शक्‍य झाली. पाकिस्तानकडून रिचर्डसनने तीन, तर स्टार्क आणि ऍबॉट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 
संक्षिप्त धावफलक 
पाकिस्तान 20 षटकांत 8 बाद 106 (इफ्तिकार अहमद 45, रिचर्डसन 3-18, ऍबॉट 2-14, स्टार्क 2-29) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया 11.5 षटकांत बिनबाद 109 (वॉर्नर नाबाद 48 -35 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, फिंच नाबाद 52- 36 चेंडू, 4 चौकार, 3 षटकार) 
 


​ ​

संबंधित बातम्या