फ्रेंच ओपन : सफाईदार विजयासह फेडररची आगेकूच 

वृत्तसंस्था
Friday, 31 May 2019

2015 नंतर प्रथमच सहभागी झालेल्या फेडररने अद्याप एकही सेट गमावलेला नाही. त्याला तिसरे मानांकन असून त्याने 14व्या वेळी चौथी फेरी गाठली. पहिले तीन गेम सर्व्हिस राखल्यानंतर रुडला चौथ्या गेममध्ये ब्रेकला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्याने सलग आठ गेम गमावले.

पॅरिस : स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने नॉर्वेच्या कॅस्पर रुडला 6-3, 6-1, 7-6 (10-8) असे हरवून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत चौथी फेरी गाठली. 

2015 नंतर प्रथमच सहभागी झालेल्या फेडररने अद्याप एकही सेट गमावलेला नाही. त्याला तिसरे मानांकन असून त्याने 14व्या वेळी चौथी फेरी गाठली. पहिले तीन गेम सर्व्हिस राखल्यानंतर रुडला चौथ्या गेममध्ये ब्रेकला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्याने सलग आठ गेम गमावले. जागतिक क्रमवारीत 63व्या स्थानावर असलेला रुड दुसऱ्या सेटमध्ये लव्हची नामुष्की टाळू शकला इतकेच. त्याने 0-5 असा पिछाडीनंतर सर्व्हिस राखली. तिसरा सेट त्याने टायब्रेकमध्ये नेला. त्याने एक मॅचपॉईंट वाचविला. मग त्याला सेटपॉईंटही मिळाला होता, पण फेडररने त्याला आणखी प्रतिकार करू दिला नाही. 

महिला एकेरीत द्वितीय मानांकित कॅरोलीना प्लिस्कोवा आणि एलिना स्विटोलीना हरल्या. चेक प्रजासत्ताकाच्या प्लिस्कोवाला क्रोएशियाच्या पेट्रा मार्टीचने 6-3, 6-3 असे हरविले. पेट्राला 31वे मानांकन आहे. तिने सातव्या गेममध्ये ब्रेक मिळविला. मग आणखी दोन गेमनंतर ब्रेक मिळवित तिने आघाडी घेतली. मग दुसऱ्या सेटच्या प्रारंभीच प्लिस्कोवाने सर्व्हिस गमावली. 

स्पेनच्या गार्बीन मुगुरुझाने स्विटोलीनाला 6-3, 6-3 असे पराभूत केले. स्विटोलीनाला नववे, तर मुगुरुझाला 19वे मानांकन आहे. मुगुरुझाने बेसलाईनवरून सरस खेळ केला. पहिल्याच सेटमध्ये तिने पाच वेळा सर्व्हिस ब्रेक मिळविली. दुसरीकडे तिचीही सर्व्हिस तीन वेळा खंडित झाली. 


​ ​

संबंधित बातम्या