World Cup 2019 : रोहितसाठी 'बेटी रन की पेटी'

मुकुंद पोतदार
Monday, 17 June 2019

या घडीला मी आयुष्यातील एका फार चांगल्या टप्यातून जात आहे. मला मुलगी झाली आहे. खरे तर तिच्या जन्मानंतर हा चांगला टप्पा सुरु झाला आहे. मी माझ्या खेळाचा आनंद लुटतो आहे.

वर्ल्ड कप 2019 : या घडीला मी आयुष्यातील एका फार चांगल्या टप्यातून जात आहे. मला मुलगी झाली आहे. खरे तर तिच्या जन्मानंतर हा चांगला टप्पा सुरु झाला आहे. मी माझ्या खेळाचा आनंद लुटतो आहे. आयपीएलमधील आमच्या मोहीमेला मोठे यश लाभले. आता या स्पर्धेतही छान सुरवात झाली आहे.
- रोहित शर्मा

मँचेस्टरमधी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहितने ही भावना व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साऊदम्प्टनला नाबाद 122, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलवर 57, तर रविवारी सर्वाधिक प्रतिष्ठेच्या लढतीत 140 असा जोरदार प्रारंभ करीत रोहितने वर्ल्ड कपचे व्यासपीठ दणाणून सोडले आहे. नैसर्गिक आक्रमक फलंदाज असलेल्या रोहितची वन-डेमधील पूर्वीची कामगिरी आणि रेकॉर्ड  थक्क करणारे आहे. यानंतरही पहिल्या तीन सामन्यांतील त्याचा खेळ चांगल्या अर्थाने अनपेक्षित ठरतो.

साऊदम्प्टनमधील शतक हे रोहितच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम असल्याचे मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले होते. तीन सामन्यांतील दुसरे शतक आणि दुसरा सामनावीर पुरस्कार स्विकारल्यानंतर रोहितने मुलीचा समाईराचा उल्लेख केला.

आयपीएलच्या मुंबईतील सामन्यानंतर रोहितने मैदानावर मुलीला छातीशी कवटाळल्याचे फोटो मुंबई इंडियन्सच्या सोशल मिडीया टीमने पोस्ट केले होते. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध हैदराबादमध्ये फायनल जिंकल्यानंतरही रोहितने मुलीबरोबर यशाचे क्षण भावपूर्ण पद्धतीने सेलीब्रेट केले होते.

स्वर्गसुखाचा धनी
मुलीच्या जन्मानंतर रोहित खरोखरच वेगळ्याच झोनमध्ये गेल्याचे दिसते. गेल्या वर्षी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ही गूड न्यूज बाहेर आली होती. मुलीच्या जन्माच्यावेळी पत्नी रितीका हिच्यासोबत असावे म्हणून तो मुंबईत परत आला होता. मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्याने रितीका व मुलीबरोबरचे फोटो पोस्ट केले होते. त्यातील रोहितच्या भावमुद्रा बघता तो स्वर्गसुखाचा धनी झाल्याचे दर्शवितात

सहकाऱ्यांची प्रतिक्रिया अन् परिपक्वता
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना रोहितबद्दलची ही बातमी टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांना कळली. त्यावेळी काही जणांनी त्याची गंमत केली. स्वतः रोहितनेच हे सांगितले होते. तो म्हणाला होता की, मी डॅडी बनणार हे कळल्यावर सहकारी खेळाडू चिडवू लागले. याचे कारण मी बेफीकीर आहे असे त्यांना वाटते. अर्थात ते माझी टिंगल करीत होते. मी अनेक गोष्टी विसरतो. मी असा असल्यामुळे ते माझ्यावर हसत होते. मी मात्र (पिता बनल्यानंतर) सारी परिस्थिती बदलवून दाखवेन.

टर्निंग पॉईंटची भावना
त्यावेळी एका कंपनीसाठी रोहितने प्रमोशनल व्हिडीओ केला होता. त्यात त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याला सांगितले होते की, पिता बनण्यासाठी मी आतूर झालो आहे. माझ्या आणि पत्नीच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉईंट असेल. आमचे आयुष्य बदलेल.
रोहितचा स्वभाव विसराळू असला तरी एक गोष्ट तो विसरलेला नाही आणि ती म्हणजे प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई. कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या चेंडूला पूल करण्याचे हुकमी अस्त्र तो भेदकपणे वापरतो.
मुलीबाबत हिंदीत काही म्हणी प्रचलित आहेत. 
बेटी पराया धन होती है, लेकीन परायी कभी नही होती. 
बेटी धन की पेटी
रोहितच्या बाबतीत बेटी रन की पेटी असे म्हणणे उचित ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या