सामन्याच्या दिवशी होणारा खेळ महत्त्वाचा ठरणार - ऍम्ब्रोस

वृत्तसंस्था
Tuesday, 15 October 2019

- हा सामना दोन्ही संघांसाठी सारखाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे उद्या सामना सुरू झाल्यावर खेळाडू कशी कामगिरी करतात यावर सर्व अवलंबून आहे

- साखळीतील अखेरच्या सामन्यात भारताला बांगलादेशाविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते

थिंम्फू (भूतान) - मुलींच्या 15 वर्षांखालील गटाच्या "सॅफ' अजिंक्‍यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात उद्या खेळाडूंची कामगिरी कशी होईल, यावर सगळे अवलंबून असेल, असे मत संघाचे प्रशिक्षक ऍलेक्‍स ऍम्ब्रोस यांनी सांगितले. 
या स्पर्धेत उद्या मंगळवारी भारत वि. बांगलादेश असा अंतिम सामना होणार आहे. प्रशिक्षक ऍम्ब्रोस म्हणाले, ""हा सामना दोन्ही संघांसाठी सारखाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे उद्या सामना सुरू झाल्यावर खेळाडू कशी कामगिरी करतात यावर सर्व अवलंबून आहे. जर, तुम्ही 90 मिनिटे सर्वोत्तम खेळ केला, तर सामना तुमचा असेल. त्यामुळे खेळाडूंना यासाटी कठोर मेहनत घ्यावी लागेल.'' 
भारतीय संघाने तीन सामन्यांतून सात गुणांची कमाई करताना गटात अव्वल स्थान पटकाविले होते. बांगलादेशाचेही तेवढेच गुण झाले होते. मात्र, सर्वोत्तम +12 अशा गोल सरासरीमुळे भारतीय महिलांचे अव्वल स्थान कायम राहिले. भारताने तीन सामन्यांत 15 गोल केले, तर केवळ तीन गोल स्वीकारले. बांगलादेशाने पाचच गोल केले आणि दोन स्वीकारले. 
साखळीतील भारताचे वर्चस्व प्रशिक्षक ऍम्ब्रोस मानायला तयार नाहीत. ते म्हणाले, ""साखळीत काय झाले ते मला माहीत नाही. प्रत्येक सामना हा नवा असतो आणि खेळात जो जिंकतो तो राजा असतो. त्यामुळे सामन्याच्या दिवशी तुमचा खेळ चांगला होणे आवश्‍यक आहे.'' साखळीतील अखेरच्या सामन्यात भारताला बांगलादेशाविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. 
भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 5.30वा. सुरू होईल. 


​ ​

संबंधित बातम्या