आशियाई बॅडमिंटन : साईना, सिंधूकडून घोर निराशा 

वृत्तसंस्था
Saturday, 27 April 2019

साईना नेहवाल तसेच पी व्ही सिंधू या भारतीय बॅडमिंटनमधील फुलराणींनी आशियाई विजेतेपदाच्या अपेक्षांचा फुगा पूर्ण फुगण्यापूर्वीच फोडला. वुहान येथील या स्पर्धेत दोघींनी एकमेकींपाठोपाठ उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळला. 

मुंबई : साईना नेहवाल तसेच पी व्ही सिंधू या भारतीय बॅडमिंटनमधील फुलराणींनी आशियाई विजेतेपदाच्या अपेक्षांचा फुगा पूर्ण फुगण्यापूर्वीच फोडला. वुहान येथील या स्पर्धेत दोघींनी एकमेकींपाठोपाठ उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळला. 

लंडन ऑलिंपिक ब्रॉंझ पदक विजेती साईना जपानच्या अकेन यामागुची हीच्याविरुद्धची अपयशाची मालिका खंडीत करु शकली नाही. दोघीतील गेल्या नऊपैकी आठव्या लढतीत साईना पराजित झाली. एक तास नऊ मिनिटांच्या लढतीनंतर साईनास 13-21, 23-21, 16-21 अशा पराभवास सामोरे जावे लागले.

साईना निर्णायक गेममध्ये सुरुवातीस घेतलेली आघाडी गमावत असताना शेजारच्या कोर्टवर सिंधूची पिछेहाट सुरु झाली होती. पहिल्या गेममध्ये चुरशीचा झाला, त्यावेळी दुसऱ्या गेममध्ये सिंधूचा खेळ उंचावेल असे वाटले होते, प्रत्यक्षात ती चीनच्या कॅई यानयान हीच्याविरुद्ध 19-21, 9-21 अशी पराजित झाली. सिंधूचा यानयानविरुद्धचा हा पहिला पराभव होता. जागतिक क्रमवारीत सिंधू यानयानपेक्षा अकरा क्रमांकाने सरस होती, पण 31 मिनिटांच्या लढतीत क्वचितच सिंधूचे वर्चस्व दिसले. 

साईनाने पहिल्या गेममध्ये ब्रेकनंतर सलग आठ गुण गमावले. दुसऱ्या गेममध्ये मोक्‍याच्यावेळी गुण जिंकले, त्यावेळी ती बहरात आली असेच वाटले. तोच जोष कायम राखत तिने निर्णायक गेममध्ये 7-2, 14-11 अशी आघाडी घेतली, पण अंतिम टप्प्यात तिने सलग सात गुण गमावले. 

भारतीय बॅडमिंटनमधील गेल्या काही वर्षातील सर्वात वाईट दिवसाची सुरुवात समीर वर्माच्या पराभवाने झाली. तो द्वितीय मानांकित शिक युक्वी याच्याविरुद्ध 10-21, 12-21 असा पराजित झाला. किदांबी श्रीकांत तसेच दुहेरीतील आव्हान यापूर्वीच आटोपले आहे.  


​ ​

संबंधित बातम्या