चीन बॅडमिंटन - साईनाही अडकली पहिल्या फेरीच्या फेऱ्यात

वृत्तसंस्था
Wednesday, 6 November 2019

- साईना नेहवालची पहिल्याच फेरीत गारद होण्याची मालिका संपण्यास तयार नाही. चीन ओपन स्पर्धेतही तिला सलामीच्या फेरीतच हार पत्करावी लागली.

- जागतिक क्रमवारीत नववी असलेली साईना यापूर्वी  डेन्मार्क ओपन, कोरिया ओपन तसेच व्हिक्‍टर चायना ओपनमध्ये पहिल्या फेरीत हरली हाेती.

मुंबई/फुझोऊ - साईना नेहवालची पहिल्याच फेरीत गारद होण्याची मालिका संपण्यास तयार नाही. चीन ओपन स्पर्धेतही तिला सलामीच्या फेरीतच हार पत्करावी लागली. साईनाच्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचे महिला एकेरीतील आव्हान आटोपले. 
फ्रेंच स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत वाटचाल सोडल्यास साईना गेल्या पाचपैकी चार स्पर्धांत पहिल्याच फेरीत पराजित झाली आहे. फुझोओ येथील स्पर्धेतील साईनाला 24 मिनिटांतच गाशा गुंडाळणे भाग पडले. सात लाख डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत तिला काई यान हिच्याविरुद्ध 9-21, 12-21 अशा पराभवास सामोरे जावे लागले. 
जागतिक क्रमवारीत नववी असलेली साईना यापूर्वी खेळलेल्या फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाली होती; पण त्यापूर्वीच्या डेन्मार्क ओपन, कोरिया ओपन तसेच व्हिक्‍टर चायना ओपनमध्ये तिला दोन गेममध्येच हार पत्करावी लागली होती. 
पुरुष एकेरीत साईनाचा पती तसेच वैयक्तिक मार्गदर्शक पारुपली कश्‍यपने पहिली फेरी पार करताना थायलंडच्या सिथिकोम थामासिन याला 21-14, 21-3 नमवले. मात्र, आता त्याच्यासमोर सातव्या मानांकित व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेनचे आव्हान असेल. जागतिक ब्रॉंझविजेत्या बी साईप्रणीतने दुसरी फेरी गाठताना इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तोला 15-21, 21-12, 21-10 असे 52 मिनिटांत पराजित केले. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी यांना पहिल्या फेरीतच तैवानच्या जोडीविरुद्ध दोन गेममध्ये पराभवास सामोरे जावे लागले. 


​ ​

संबंधित बातम्या