जागतिक युवा कुस्ती - कुस्तीगीर रवीला रिपेचेजद्वारे आशा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

- जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेत तीनदा पदक जिंकलेला साजन भानवाल जागतिक युवा (23 वर्षांखालील) कुस्ती स्पर्धेत 77 किलो गटातील ब्रॉंझ पदकाच्या लढतीत पराभूत झाला

- रवीला 97 किलो गटात रिपेचेजद्वारे पदक जिंकण्याची संधी आहे. 

मुंबई - जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेत तीनदा पदक जिंकलेला साजन भानवाल जागतिक युवा (23 वर्षांखालील) कुस्ती स्पर्धेत 77 किलो गटातील ब्रॉंझ पदकाच्या लढतीत पराभूत झाला. मात्र, त्यानंतरही बुडापेस्ट येथील या स्पर्धेत रवीला 97 किलो गटात रिपेचेजद्वारे पदक जिंकण्याची संधी आहे. 
हंगेरीतील या स्पर्धेतील ब्रॉंझ पदकाच्या लढतीत साजन तुर्कीच्या सेर्कान अक्कोयुन याला आव्हानही देऊ शकला नाही. साजनने ही लढत 1-10 अशी गमावली. साजनला उपांत्य फेरीत निसटती हार पत्करावी लागली होती. रवीला उपांत्यपूर्व फेरीत जॉर्जियाच्या जिऑर्जी मेलिया याने 8-0 असे सहज हरवले होते, पण जिऑर्जीने अंतिम फेरी गाठल्याने रवीला रिपेचेजद्वारे संधी मिळाली. 
शनिवारी रात्री उशिरा झालेल्या रिपेचेज लढतीत निराशाच पदरी आली होती. अर्जुन हालाकुर्की 55 किलो गटातील रिपेचेजमध्ये आर्मेनियाच्या हाखोयानविरुद्ध 2-10 असा हरला. सुनील कुमारने 87 किलो गटाच्या रिपेचेजमध्ये सुरवातीच्या फेरीत स्वीडनच्या जॉर्जी स्तेपानेतिक याला 5-3 असे हरवले, पण तो क्रोएशियाच्या इवान हुकलेकविरुद्ध 3-6 असा हरला. 
ग्रीको रोमनच्या दुसऱ्या दिवशी सुरू झालेल्या स्पर्धेत अन्य भारतीयांना एकही लढत जिंकता आली नाही. सचिन राणा 60 किलो गटात चीनच्या लिगुओ कॅओविरुद्ध 2-5 पराजित झाला; तर रशियाच्या मागोमेद यार्बिलोव याने राहुलचा 72 किलो गटातील लढतीत 10-0 धुव्वा उडवला. नीरज सर्बियाच्या ब्रॅंको कोवासेविकविरुद्ध 82 किलो गटात 1-10 असा किरकोळीत हरला. रविंदरला उपउपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश होता, पण तो तुर्कीच्या हॅकी कॅराकुसविरुद्ध 1-2 असा पराजित झाला. 
 


​ ​

संबंधित बातम्या