Schoolympics 2019 : सेंट झेवियर्स, चाटे, विबग्योरची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

तवनाप्पा पाटणे, छत्रपती शाहू, न्यू मॉडेल, संजीवन पब्लिक स्कूल विजयी...

कदमवाडीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर सेंट झेवियर्स हायस्कूलने १० षटकांत ९३ धावा केल्या. त्यांचे नऊ गडी बाद झाले. विनायक कोळेकरने ३६ चेंडूंत नाबाद ६० धावा ठोकल्या.

कोल्हापूर - मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सेंट झेवियर्स, हनुमंतराव चाटे, तवनाप्पा पाटणे, विबग्योर, छत्रपती शाहू (सीबीएसई), न्यू मॉडेल इंग्लिश व संजीवन पब्लिक स्कूलने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. गडहिंग्लजच्या जागृती हायस्कूलचा संघ अपात्र ठरल्याने न्यू इंग्लिश मीडियम स्कूलला विजयी घोषित करण्यात आले. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहेत.

 कदमवाडीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर सेंट झेवियर्स हायस्कूलने १० षटकांत ९३ धावा केल्या. त्यांचे नऊ गडी बाद झाले. विनायक कोळेकरने ३६ चेंडूंत नाबाद ६० धावा ठोकल्या. त्याने ८ चौकार व एक षट्‌कार ठोकला. श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलकडून ओमकार लाडने एक गडी बाद केला. जयसिंगराव घाटगे हायस्कूलला चार गडी गमावून ७९ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांच्या प्रज्वल बामणेने नाबाद ३६ धावा केल्या. सेंट झेवियर्सने १४ धावांनी घाटगे हायस्कूलला हरविले. 

हनुमंतराव चाटे विद्यालयाने नऊ षट्‌कांत सहा गड्यांच्या मोबदल्यात ८३ धावा केल्या. त्यांच्या दर्शन पाटीलने नाबाद ४५ धावा फटकावताना नऊ चौकार मारले. छत्रपती शाहू विद्यालयाकडून (सीबीएसई) तनिष झगडेने दोन गडी बाद केले. शाहू विद्यालयाला नऊ षटकांत ४१ धावा करता आल्या. त्यांचे सहा गडी बाद झाले. चाटे विद्यालयाकडून अदित्य खटावकरने चार धावांत चार गडी बाद केले.

श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालयाने १० षट्‌कांत नऊ गडी गमावून ४५ धावा केल्या. तवनाप्पा पाटणे हायस्कूलकडून देवराज पवारने सात धावांत चार गडी बाद केले. तवनाप्पा पाटणे हायस्कूलने ६ षट्‌कांत दोन गडी गमावून ४७ धावा केल्या. रोहित माणगावकरने नाबाद १८ धावा केल्या. 
कागलच्या शाहू मैदानावर रॉयल इंग्लिश मीडियम हायस्कूलचा १० षटकांत १८ धावांत खुर्दा उडाला. विबग्योरच्या श्रेय शेठने दोन धावांत तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल विबग्योरने १ षट्‌क व २ चेंडूंत १९ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांच्या राचित चौगुलेने नाबाद १६ धावा केल्या. छत्रपती शाहू विद्यालयाने (सीबीएसई) तीन गडी गमावून ८४ धावांचे आव्हान ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमी हायस्कूलसमोर ठेवले. त्यांच्या आदित्य घाटगेने १६ धावा केल्या. ओरिएंटलला डावात ८ षट्‌कांत ५ गडी गमावून ४१ धावा करता आल्या. ओरिएंटलने निर्धारित वेळेत षट्‌के पूर्ण न केल्याचा फटका त्यांना बसला. 
न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलने तीन गडी गमावून ६४ धावा केल्या. ओम भेंडेने ३० धावांचे योगदान दिले. विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूलला पाच गडी गमावून ६१ धावा करता आल्या. त्यांच्या गंधर्व चौगलेने नाबाद २२ धावा केल्या. संजीवन पब्लिक स्कूलने चार गडी गमावून १०३ धावांचा डोंगर महावीर इंग्लिश स्कूलसमोर ठेवला. त्यांच्या अथर्व शिंदेने २६ चेंडूंत ४६ धावा केल्या. महावीर इंग्लिश स्कूलला पाच गडी गमावून ४८ धावा करता आल्या. तन्मय पवारने सर्वाधिक ११ धावा केल्या. संजीवन पब्लिक स्कूलकडून अजिंक्‍य पाटीलने दोन गडी बाद केले.


​ ​

संबंधित बातम्या