Schoolympics 2019 चाटे, पाटणे, विबग्योर, संजीवनची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

 सुसंस्कार, सेव्हंथ डे, आयर्विन ख्रिश्‍चन विजयी

‘सकाळ माध्यम’ प्रस्तुत ही स्पर्धा आहे. कदमवाडीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटल व कागलच्या शाहू मैदानावर सामने सुरू आहेत. 

कोल्हापूर : मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंअंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धेत हनुमंतराव चाटे, तवनाप्पा पाटणे, विबग्योर, संजीवन पब्लिक, सुसंस्कार, सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट, संजय घोडावत इंटरनॅशनल व आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलने प्रतिस्पर्ध्यांना आज हरविले. चाटे स्कूलच्या वासीम मुल्लाणीने ५५ धावा करत स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठोकले.

‘सकाळ माध्यम’ प्रस्तुत ही स्पर्धा आहे. कदमवाडीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटल व कागलच्या शाहू मैदानावर सामने सुरू आहेत.हनुमंतराव चाटे स्कूलने १० षटकांत तीन गडी गमावून ८६ धावा केल्या. त्यांच्या दर्शन पाटीलने नाबाद ४९ धावा ठोकल्या. त्याने सहा चौकार मारले. सेंट झेवियर्स हायस्कूलकडून इथान रॉड्रिग्जने एक गडी बाद केला. सेंट झेवियर्सचा डाव १० षटकांत ३२ धावांत आटोपला. अभिनव मांडवकरने ११ धावा केल्या. चाटे स्कूलच्या आर्यन वर्माने चार गडी बाद केले. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलला १० षटकांत ३३ धावा करता आल्या. त्यांचे सहा फलंदाज बाद झाले. गगन करांडेने ९ धावा केल्या. तवनाप्पा पाटणे हायस्कूलकडून देवराज पोवारने ४ फलंदाज बाद केले. पाटणे हायस्कूलने अवघ्या दोन षटकांत बिनबाद ३५ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांच्या कपिल सांगावकरने नाबाद १९ धावा केल्या.

न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलने १० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात ५७ धावांचे आव्हान विबग्योर हायस्कूलसमोर ठेवले. त्यांच्या पार्थ दळवीने २५ धावा केल्या. विबग्योरकडून कृष्णम झंवरने दोन फलंदाज तंबूत परतवले. विबग्योरने ९ षटके चार चेंडूंत ५९ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांचे सात गडी बाद झाले. राजवर्धन घोरपडेने नाबाद २३ धावा केल्या. न्यू मॉडेलकडून मनीत देंबडाने एक फलंदाज बाद केला. छत्रपती शाहू विद्यालयाने (एसएससी) १० षटकांत चार गडी गमावून ५३ धावा केल्या. हर्षवर्धन चव्हाणने १६ धावा केल्या. संजीवन पब्लिक स्कूलकडून प्रणव घोगरेने एक गडी बाद केला. संजीवन पब्लिकने ५ षटके तीन चेंडूंत ५४ धावा फटकाविल्या. त्यांच्या सार्थक गायकवाडने १९ धावांचे योगदान दिले. शाहूकडून सार्थक लिगडेने एक गडी बाद केला. 

कागलच्या शाहू मैदानावर सुसंस्कार हायस्कूलने १० षटकांत तीन गडी गमावून १०२ धावांचा डोंगर रचला. करण वाघमोडेने २१ चेंडूंत ४० धावा केल्या. दानोळी हायस्कूलकडून रिहान तांबोळीने एक फलंदाज बाद केला. दानोळी हायस्कूलला सात गडी गमावून ६० धावा करता आल्या.अनिकेत पोवारने २५ धावा केल्या. सुसंस्कारकडून अभिषेक आंब्रेने दोन फलंदाज बाद केले. 
सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलने १० षटकांत दोन गडी गमावून ९५ धावा केल्या. प्रथम नागदेवने २८ धावा केल्या. चाटे स्कूलकडून अथर्व लाडने एक फलंदाज बाद केला. चाटे स्कूलने १० षटकांत एक गडी गमावून ९२ धावांपर्यंत मजल मारली. त्यांचा केवळ तीन धावांनी पराभव झाला. वासीम मुल्लाणीने ३६ चेंडूंत नाबाद ५५ धावा ठोकल्या. सेव्हंथ डेकडून श्रेयस सरगरने एक फलंदाज बाद केला.

 संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने (सीबीएसई) १० षटकांत दोन गडी गमावून ९४ धावा फटकाविल्या. त्यांच्या अदित्य फुकळेने ३१ धावा केल्या. एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या कातिर्क पाटीलने एक फलंदाज बाद केला. एस. एम. लोहिया हायस्कूलला १० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ४९ धावा करता आल्या. प्रथम सावनूरने २२ धावा केल्या. घोडावत स्कूलकडून अंश काश्‍नीवालने एक फलंदाज बाद केला. आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलने १० षटकांत ११६ धावा केल्या. अविनाश कांबळेने नाबाद ३७ धावा केल्या. कोल्हापूर पब्लिक स्कूलकडून सार्थक पाखरेने एक फलंदाज बाद केला. कोल्हापूर पब्लिकला १० षटकांत पाच गडी गमावून ५३ धावा करता आल्या. जुनैद मलबारीने २५ धावा केल्या. आयर्विनकडून रोहित गिरीने पाच धावांत तीन फलंदाज 
तंबूत परतवले.


​ ​

संबंधित बातम्या