जागतिक महिला बॉक्‍सिंग - अनुभवी सरिता प्रतिआक्रमणाने बेजार

वृत्तसंस्था
Sunday, 6 October 2019

- जागतिक महिला बॉक्‍सिंगमधील भारताची पीछेहाट कायम राहिली. माजी विजेती सरितादेवी आणि नंदिनी यांना एकतर्फी लढतीत पराभवास सामोरे जावे लागले.

- रशियाच्या नतालिया शाद्रिनाविरुद्ध जोरदार सुरवातही केली; पण त्यानंतर तिचा खेळ खालावत गेला

- नंदिनीने दुसऱ्या फेरीत प्रतिआक्रमण करताना डोक्‍याच्या पाठीमागच्या बाजूला ठोसा दिला. त्याबद्दल तिला ताकीद मिळाली. त्यानंतर ती जास्तच खच्ची झाली.

मुंबई -  जागतिक महिला बॉक्‍सिंगमधील भारताची पीछेहाट कायम राहिली. माजी विजेती सरितादेवी आणि नंदिनी यांना एकतर्फी लढतीत पराभवास सामोरे जावे लागले. उलान उदे (रशिया) येथील स्पर्धेत आतापर्यंत भारतास दोनच विजय गवसले आहेत. 
सरितादेवी पुनरागमनात 60 किलो गटात प्रभावी ठरेल, असा कयास होता. तिला स्पर्धेत चौथे मानांकनही होते, पहिल्या फेरीत बाय मिळाला होता, रशियाच्या नतालिया शाद्रिनाविरुद्ध जोरदार सुरवातही केली; पण त्यानंतर तिचा खेळ खालावत गेला. अखेर पंचांनी सरिता पराजित झाल्याचा कौल एकमताने दिला. नंदिनीबाबत फार काही वेगळे घडले नाही. जर्मनीच्या इरिना निकोलेता हिला आव्हान देण्यातही नंदिनी कमी पडली. त्यामुळे सर्व पंचांनीही तिच्याविरुद्ध निकाल दिला आणि ती 0-5 पराभूत झाली. 
सरिताने 2006 च्या दिल्ली जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने अनेकदा आशियाई स्पर्धाही जिंकली आहे. तिने जोरदार आक्रमक सुरवात करीत प्रतिस्पर्धीस बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले होते. मात्र, त्यानंतरच्या दोन फेरीत सरितास प्रतिस्पर्धीच्या जोरदार प्रतिआक्रमणास सामोरे जावे लागले. प्रतिस्पर्धीची आक्रमकता सरितास अपेक्षित नव्हती. त्यामुळे काय करावे हेच जणू तिला दुसऱ्या फेरीपासून सुचेनासे झाले. तिची पीछेहाट होत गेली. पहिल्या फेरीतील वर्चस्वाचा सरितास फारसा फायदा झाला नाही. 
नंदिनीची प्रतिस्पर्धी तिच्यापेक्षा सर्वच बाबतीत सरस होती. नंदिनीने दुसऱ्या फेरीत प्रतिआक्रमण करताना डोक्‍याच्या पाठीमागच्या बाजूला ठोसा दिला. त्याबद्दल तिला ताकीद मिळाली. त्यानंतर ती जास्तच खच्ची झाली. तिच्या डोळ्याच्या वरच्या भागात दुखापत झाली. दरम्यान, भारताच्या स्वीटी बुरा आणि जमुना बोरो यांनीच सलामीची लढत जिंकली आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या