सात्त्विक-चिरागचे आव्हान संपुष्टात

वृत्तसंस्था
Saturday, 9 November 2019

- भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचे चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान अखेर उपांत्य फेरीत संपुष्टात आले

- अव्वल मानांकित मार्कस फेर्नाल्डी गिडॉन-केविन संजया सुकामुल्जो जोडीने त्यांचा 21-16, 22-20 असा पराभव केला

फुझोऊ -  भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचे चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान अखेर उपांत्य फेरीत संपुष्टात आले. तीनवेळच्या विजेत्या आणि अव्वल मानांकित मार्कस फेर्नाल्डी गिडॉन-केविन संजया सुकामुल्जो जोडीने त्यांचा 21-16, 22-20 असा पराभव केला. 
सात्त्विक आणि चिराग जोडीचा इंडोनेशियाच्या या अव्वल मानांकित जोडीविरुद्धचा सलग आठवा पराभव ठरला. भारतीय जोडीने या वर्षी थायलंड ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्यांच्या कामगिरीत कमालीचे सातत्य होते. मात्र, त्यांना विजेतेपदाची जोड देता येत नव्हती. चीनमध्येदेखील तेच झाले. 
भारतीय खेळाडूंचे एकेरीतील आव्हान झटपट संपुष्टात येत असताना सात्त्विक-चिराग जोडीने दुहेरीतून भारताचे आव्हान राखले होते. मात्र, प्रयत्नांची शिकस्त करूनही त्यांना यश आले नाही. त्यांनी 40 मिनिटांत लढत गमावली. भारतीय जोडीने पहिल्या गेमला 7-4 अशी आश्‍वासक सुरवात केली. पण, त्यांच्या आक्रमणात नेमकेपणाचा अभाव होता आणि त्याचा फायदा घेत अव्वल मानांकित जोडीने गेमच्या मध्याला 11-9 अशी आघाडी घेतली. सात्त्विकला प्रतिस्पर्ध्यांचे फटके परतविण्यात अपयश येत होते, तर प्रतिलस्पर्धी जोडीपैकी केविन नेटवर भलताच प्रभावी ठरत होता. यामुळे त्यांनी 14-9 अशी आघाडी भक्कम केली. त्यानंतरही भारतीय जोडीने जोरदार प्रत्युत्तर देत एकवेळ पिछाडी 15-17 अशी कमी केली होती. पण, त्यानंतर त्यांना सातत्य राखता आले नाही. इंडोनेशियन जोडीने एक गेम पॉइंट वाचवल्यानंतर पहिली गेम जिंकली. 
दुसऱ्या गेमला पुन्हा एकदा सात्त्विक-चिराग यांनी आघाडी घेतली होती. पण, मार्कस आणि केविन यांनी 6-6 अशी बरोबरी राखली. त्या वेळी भारतीय जोडीने जोरदार खेळ करत पुन्हा 9-8 अशी आघाडी घेतली. प्रदीर्घ रॅलीज करून गुण मिळविण्यावर भारताचा भर राहिला होता. त्यामुळे बरोबरीत चाललेल्या गेममध्ये भारतीय जोडी 16-14, 18-16 अशी आघाडीवर राहिली. त्या वेळी मार्कस आणि केविन जोडीन सलग तीन गुण घेत आघाडी मिळविली आणि नंतर एक मॅचपॉइंट वाचवत त्यांनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 
 


​ ​

संबंधित बातम्या