चीन ओपन बॅडमिंटन - चिराग - सात्विकमुळे भारताचे आव्हान कायम

वृत्तसंस्था
Thursday, 7 November 2019

- चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी भारताच्या आशा कायम राखल्या

- बी साई प्रणित आणि पारुपली कश्‍यपच्या पराभवामुळे भारताचे एकेरीतील आव्हान आटोपले आहे

मुंबई - पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत, बी साई प्रणित आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरत असताना चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी भारताच्या आशा कायम राखत आहेत. चीन स्पर्धेतून त्यांनी हे पुन्हा एकदा दाखवून दिले. 
चिराग - सात्विकने त्यांच्यापेक्षा सरस खेळाडूंना पराजित करण्याची मालिका कायम ठेवताना हिरोयुकी एंदो - युता वातांबे या सहाव्या मानांकित जोडीला 21-18, 21-23, 21-11 असे 66 मिनिटे चाललेल्या लढतीत हरवले. चिराग - सात्विकने सलग दुसऱ्या लढतीत जपानच्या जोडीला नमवले आहे. यापूर्वीचा विजय फ्रेंच स्पर्धेत होता. त्यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांत भारतीय जोडीस एकतर्फी हार पत्करावी लागली होती. 
भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये 14-17 पिछाडीनंतर सलग सहा गुण जिंकले होते. दुसऱ्या गेममध्ये दोन गेम पॉईंट दवडले, पण निर्णायक गेममध्ये विश्रांतीला 11-3 आघाडी घेत निकाल स्पष्ट केला होता. गेल्या महिन्यात फ्रेंच उपविजेतेपद जिंकलेल्या भारतीय जोडीसमोर आता चीनच्या जोडीचे आव्हान असेल. 
सात्विकला मिश्र दुहेरीत हार पत्करावी लागली. सात्विक आणि अश्विनी पोनप्पा यांना कोरियाच्या सेऊंज जाए सेओ - युजुंग चाएविरुद्ध 21-23, 16-21 अशा पराभवास सामोरे जावे लागले. या चाळीस मिनिटे चाललेल्या लढतीत सात्विक - अश्विनीने दोन गेम पॉईंट दवडले होते. 
दरम्यान, बी साई प्रणित आणि पारुपली कश्‍यपच्या पराभवामुळे भारताचे एकेरीतील आव्हान आटोपले आहे. साईनाचा पती तसेच मार्गदर्शक पारुपली कश्‍यप व्हीक्‍टर ऍक्‍सेलसेनविरुद्ध 13-21, 19-21 असा पराभूत झाला. जागतिक ब्रॉंझ विजेता प्रणीत डेन्मार्कच्या आँद्रेस अँटीसनविरुद्ध 22-20, 20-22, 16-21 असा पराजित झाला. पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवालचे आव्हान यापूर्वीच संपले आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या