Schoolympics 2019 : कोल्हापूरात मॅप्रो स्कूलिंपिक्‍सला दिमाखात प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

सकाळ माध्यम प्रस्तूत 'मॅप्रो स्कूलिंपिक्‍स-2019' शालेय क्रीडा स्पर्धेचे. कदमवाडीतील डी. वाय. पाटील मैदानावर स्पर्धेचे आज दिमाखात उद्‌घाटन झाले. 

कोल्हापूर - चौकार-षटकारांची आतषबाजी, टेनिसचे सुपर शॉट्‌स व व्हॉलीबॉलमधील परफेक्‍ट सर्व्हिसने प्रेक्षकांचे डोळे आज थरारले. कौशल्य पणाला लावत शालेय खेळाडूंनी खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत आजचा दिवस अक्षरश: गाजवला. समर्थकांच्या टाळ्या व शिट्यांनी जोर धरत खेळाडूंना दिलेले प्रोत्साहनही लक्ष वेधणारे ठरले. निमित्त होते सकाळ माध्यम प्रस्तूत "मॅप्रो स्कूलिंपिक्‍स-2019' शालेय क्रीडा स्पर्धेचे. कदमवाडीतील डी. वाय. पाटील मैदानावर स्पर्धेचे आज दिमाखात उद्‌घाटन झाले. 

स्पर्धेची घोषणा होताच शालेय खेळाडूंची उत्सुकता शिगेला पोचली. गतवर्षीपेक्षा यंदा शाळांच्या सहभागाचा आकडाही वाढला. स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी शाळांचा सरावही झोकात सुरू झाला. स्पर्धेचा दिवस कधी उजाडतो, अशी उत्कंठा खेळाडूंत होती. कदमवाडीतील डी. वाय. पाटील मैदानावर क्रिकेट, विभागीय क्रीडा संकुलात टेनिस, तर पन्हाळ्यावरील पन्हाळा विद्यामंदिर व शाहू क्रीडा मंडळाच्या मैदानावर व्हॉलीबॉलचा थरार आज सुरू झाला. समर्थकांनी मैदानात उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. 

सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार, मधुरिमाराजे छत्रपती, मॅप्रो फूडस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निकुंज वोरा, चितळे डेअरीचे संचालक मकरंद चितळे, सरव्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. या वेळी श्री. पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांत आरोग्यदायी वातावरणासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण असून, यंदा स्पर्धेतील शाळांचा आकडा वाढल्याचे सांगितले. या वेळी "सकाळ'चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, खोचगे ऍग्रो फूडस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अरूण खोचगे, सुजाता खोचगे, डी. वाय. पाटील ग्रुपचे अजित पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, सकाळ इव्हेंटचे राकेश मल्होत्रा उपस्थित होते.  

सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेला स्कूलिंपिक्‍स उपक्रम स्तुत्य आहे. सलग दुसऱ्यावर्षी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अडीचशे शाळा, दहा हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग हे उपक्रमाचे यश आहे. मुलांनी नेहमी खेळले पाहिजे. खेळातूनच मुलांचा शारीरिक व मानसिक विकास अधिक होतो. उपक्रमांतर्गत तब्बल बावीस खेळांचा समावेश आहे. यामुळे सहभागी मुलांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागाचा सराव येथेच होत आहे. मुलांचा खेळ सुधारण्यासाठी मदत होत आहे. "सकाळ'मुळे मुलांना राष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ देऊन त्यांना प्रसिद्धी देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करावे थोडेच आहे. 
- मधुरिमाराजे छत्रपती 

शालेय जीवनात ऑलिंपिक स्तरासारख्या स्पर्धांना सामोरे जाण्याचा अनुभव मिळणे मोठी बाब आहे. अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे सकाळ माध्यम समूहाचे विशेष यश आहे. ऑलिंपिकच्या धर्तीवर व त्याच उच्च कोटीच्या पात्रतेच्या स्पर्धेमुळे सहभागी स्पर्धकांना पुढील आयुष्यात सर्वाधिक फायदा होणार आहे. या प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन होणे चांगले आहे. स्पर्धेतून सहभागी खेळाडूला त्याच्या भवितव्यसाठी योग्य दिशा मिळणार आहे. 
- डॉ. विलास नांदवडेकर,कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ 

कोल्हापूर ही क्रीडांनगरी आहे. येथे विविध खेळातील कौशल्यप्राप्त खेळाडू आहेत. ज्यांनी आपले नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. "सकाळ'ने घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून याद्वारे देश पातळीवरील स्पर्धांचा सराव स्पर्धेतून होणार आहे. या स्पर्धेद्वारे खेळाडूंना विविध खेळात सहभागाची संधी मिळते आहे. आपले कौशल्य दाखवता येत आहे. सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी खेळले पाहिजे, स्वतःचे कौशल्य दाखवले पाहिजे. यातूनच पुढे जाऊन जिल्हास्तरीय, विभागीय, राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळत स्वतःचे व स्वतःच्या शाळेचे, जिल्ह्याचे व पर्यायाने राज्याचे नाव उंचावता येते. 
- डॉ. चंद्रशेखर साखरे,जिल्हा क्रीडाधिकारी 
 


​ ​

संबंधित बातम्या