Schoolympics 2019 : घोडावत, कोल्हापूर पब्लिक, लोहियाची आगेकूच - स्कूलिंपिक्‍स-2019

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

आयर्विन ख्रिश्‍चन, सेव्हंथ डे, दानोळी,चाटे स्कूलही विजयी 

कागलच्या शाहू स्टेडियमवर अल्फान्सो स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज विरूद्ध संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यांच्यात पहिला सामना झाला.

 

कोल्हापूर - सोळा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई), कोल्हापूर पब्लिक स्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल, सेव्हंथ डे ऍडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल, दानोळी हायस्कूल, चाटे स्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली. नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलच्या प्रतिक पाटीलने सलग तीन षटकार ठोकत जबरदस्त फलंदाजी केली. सकाळ माध्यम प्रस्तूत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स-2019 शालेय क्रीडा स्पर्धेस आज येथे सुरवात झाली. 

कागलच्या शाहू स्टेडियमवर अल्फान्सो स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज विरूद्ध संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यांच्यात पहिला सामना झाला. अल्फान्साने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांत 55 धावा करत तीन गडी बाद केले. त्यांच्या कृष्णा सिंगने 14 धावा केल्या. घोडावत स्कूलकडून अमोघ देसाईने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल घोडावत स्कूलने 5 षटके व चार चेंडूत 56 धावा करत सामना जिंकला. त्यांचा गडी बाद झाला. आर्यन फडकेने 19 चेंडूत 29 धावा फटकाविल्या. त्यात चार चौकारांचा समावेश होता.

अल्फान्सोकडून वर्धन पाटीलने एक गडी बाद केला. 
जरगनगरच्या साई इंग्लिश मीडियम स्कूलने राजेंद्रनगरातील कोल्हापूर पब्लिक स्कूलसमोर तीन गड्यांच्या मोबदल्यात 59 धावांचे आव्हान ठेवले. त्यांच्या अभिषेक भदरगेने 16 धावा केल्या. कोल्हापूर पब्लिककडून देवरणवीर थोरातला एक गडी बाद करता आला. कोल्हापूर पब्लिकने 5 षटके व एका चेंडूत 63 धावा फटकावून साई इंग्लिश स्कूलला हरविले. त्यांच्या जुनैद मलबारीने 17 चेंडूत 28 धावा ठोकल्या. त्यात तीन चौकारांचा समावेश होता. कोल्हापूर पब्लिकच्या राजवर्धन पोवारने एक गडी तंबूत परतवला. 
डॉ. डी. वाय. पाटील शांतिनिकेतनने 10 षटकांत दोन गडी गमावून 80 धावा केल्या. वंश आजगावकरने 46 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने सहा चौकार ठोकले. एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या आर्यन सूर्यवंशीने एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने 9 षटके व चार चेंडूत 82 धावा फटकावून शांतिनिकेतनला धक्का दिला. त्यांच्या कार्तिक कागले-पाटीलने नाबाद 41 धावा केल्या. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. 

सिद्धनेर्लीच्या प्रियदर्शिनी इंदिरा हायस्कूलचा डाव 9 षटके व पाच चेंडूत 24 धावांत आटोपला. त्यांच्या अमृत मानेने 6 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलने 3 षटकांत बिनबाद 27 धावा फटकावून सामना जिंकला. त्यांच्या मतीन शेखने नाबाद 13 धावा केल्या. 
कदमवाडीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर सेव्हंथ डे ऍडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलने 86 धावांचे आव्हान नवे पारगावच्या वारणा विद्यानिकेतनसमोर ठेवले. त्यांच्या यतिराज पाटोळेने नाबाद 38 धावा केल्या. वारणा विद्यानिकेतनकडून श्रेयश शिंदेने एक गडी बाद केला. वारणा विद्यानिकेतनला 10 षटकांत सात गडी गमावून 81 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांच्या ऋषी शेटेने 16 धावा केल्या. 

नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलने 10 षटकांत पाच गडी गमावून 84 धावा केल्या. त्यांच्या प्रतिक पाटीलने नाबाद 36 धावा केल्या. त्याने सलग तीन षटकार ठोकले. दानोळी हायस्कूलकडून रिहान तांबोळीने एक गडी बाद केला. दानोळी हायस्कूलने 9 षटके व पाच चेंडूत 85 धावा फटकावून सामना जिंकला. त्यांच्या सूरज वाघमारेने नाबाद 38 धावा ठोकत विजयाचा मोलाचा वाटा उचलला. त्याने पाच चौकार व एक षटकार ठोकला. 

श्रीमंत माईसाहेब बावडेकर ऍकॅडमीने 10 षटकांत 67 धावा केल्या. त्यांचे दोन गडी बाद झाले. धैर्यशील चौगुलेने नाबाद 27 धावा फटकाविल्या. चाटे स्कूलकडून वासीम मुल्लाणीने एक गडी बाद केला. चाटे स्कूलने 7 षटकांत बिनबाद 70 धावा केल्या. वासीम मुल्लाणीने 20 चेंडूत 36 धावांची आक्रमक फलंदाजी केली. त्याने सहा चौकार ठोकले. 
 


​ ​

संबंधित बातम्या