अखिल भारतीय हॉकी स्पर्धा - एसजीपीसी, एमपी ऍकॅडमी उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

-  शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी), अमृतसर आणि गतविजेत्या एमपी हॉकी ऍकॅडमी संघांनी सलग दुसऱ्या विजयासह येथे सुरू असलेल्या 16 वर्षांखालील एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

- एसजीपीसी संघाने तुफानी वेगवान खेळ करताना "ग' गटातील सामन्यात हॉकी नाशिक संघाला 14-0 असे निष्प्रभ केले

-  ई गटातील सामन्यात भोपाळच्या असिबाघ स्पोर्टस सेंटर संघाने देखील एकतर्फी विजय मिळविला कोहिनूर ऍकॅडमीचा 15-0 असा धुव्वा उडविला

पुणे - शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी), अमृतसर आणि गतविजेत्या एमपी हॉकी ऍकॅडमी संघांनी सलग दुसऱ्या विजयासह येथे सुरू असलेल्या 16 वर्षांखालील एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत एसजीपीसी संघाने तुफानी वेगवान खेळ करताना "ग' गटातील सामन्यात हॉकी नाशिक संघाला 14-0 असे निष्प्रभ केले. एसजीपीसी संघाचा वेगवान खेळ वैशिष्ट्यपूर्ण ठरत असून, त्यांनी दोन सामन्यात 35 गोल केले आहेत. त्यांनी एकही गोल स्विकारलेला नाही.
त्यांच्या विजयात विक्रमजीत सिंग याने 4, 38, आणि 41व्या मिनिाला गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. अमृतपाल सिंगने दोन, तर सरबजींदर सिंग, जोबनज्योत सिंग, हरप्रीत सिंग, सगनप्रीत सिंग, सुखचेन सिंग आणि जगप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. बाद फेरीत प्रवेश मिळविणारा एसजीपीसी हा पहिला संघ ठरला. अ गटातील सामन्यात एमपी ऍकॅडमी संघाने आपले वर्चस्व कायम राखताना रिजनल डेव्हलपमेंट सेंटर संगाचा 8-1 असा पराभव केला. श्रेयस धुपे याने दोन, तर अली अहमद, शैलेंद्र सिंग, विकी पांड्या, प्रियोबात्रा तेलेम, महंमद झैद खान, हैदर अली यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. पराभूत संगाचा एकमात्र गोल ऑगस्टिन मुंडु याने केला.
आजच्या दिवसात झालेल्या ई गटातील सामन्यात भोपाळच्या असिबाघ स्पोर्टस सेंटर संघाने देखील एकतर्फी विजय मिळविला कोहिनूर ऍकॅडमीचा 15-0 असा धुव्वा उडविला. मोहित कर्मा याने तीन गोल करताना विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याला सद्दाम अहमद, अब्दुल रईस, महंमद झमीर आणि महंमद अनस यांनी प्रत्येकी दोन गोल करत सुरेख साथ केली. सौरभ डांडे, अमित सिंग राजपूत, काशिफ खान आणि अऱ्हम झमीर अन्सारी यांनी एकेक गोल करून संघाचे गोलाधिक्‍य वाढविले.
अखेरच्या सामन्यात मुंबई स्कूल स्पोर्टस संघटना संघास हॉकी कूर्ग विरुद्ध ह गटातील सामन्यात 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागली. एका गोलने पिछाडीवर राहिलेल्या मुंबई संघाला राहुल यादव याने सामन्याच्या 56व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावून बरोबरी मिळवून दिली.
----------
निकाल ः
ग गट - एसजीपीसी, अमृतसर 14 (अमृतपाल सिंग 2, 31वे, विक्रमजित सिंग 4, 38, 41वे, सरबजींदर सिंग 8वे, जोबनज्योत फंटु सिंग 24वे, कंवलजीत सिंग 29वे, 50वे, हरप्रीत सिंग 41वे, सगनप्रीत सिंग 45वे, सुखचेन सिंग 47वे, जगप्रीत सिंग 58वे मिनिट) वि.वि. हॉकी नाशिक 0. मध्यंतर 5-0

ई गट - असिबाघ स्पोर्टस सेंटर, भोपाळ 8 ( मोहित कर्मा 4, 15, 31वे, सौरभ दांडे 5वे, सद्दाम अहमद 10, 14वे, अब्दुल रईस 21, 30वे, महंमद झमीर 46, 48वे, अमित सिंहग राजपूत 45वे, महंमद अनस 47, 59वे, कासिफ खान 50वे, अऱ्हम झमीर अन्सारी 60वे मिनिट) वि.वि. कोहिनूर ऍकॅडमी, उत्तर प्रदेश 0. मध्यंतर 7-0

अ गट - एमपी ऍकॅडमी 8 (अली अहमद 14वे, शैलेंद्र सिंग 23वे, विकी पांड्या 27वे, प्रियोबात्रा तेलेम 32वे, महंमद झैद खान 39वे, श्रेयस धुपे 46, 48वे, हैदर अली 51वे मिनिट) वि.वि. रिजनल डेव्हलपमेंट सेंटर 1 (ऑगस्टिन मुंडू 59वे मिनिट) मध्यंतर 2-0

ब गट - कमांडर नंदी सिंग हॉकी ऍकॅडमी 7 (सिगिन मुंडू 4, 43वे, नरेंद्र राजबन्सी 17वे, शितीस सिंग 21, 39, 47वे, संदीप डोडरे 52वे मिनिट) वि.वि. ओटीएचएल इलेव्हन, नवी दिल्ली 0. मध्यंतर 3-0

ह गट - मुंबई स्कूल स्पोर्टस असोशिएशन 2 (राजन गोंड 14, राहुल यादव 56वे मिनिट) बरोबरी वि. हॉकी कूर्ग 2 (ध्रुविन डी 10 आणि 42वे मिनिट). मध्यंतर 1-1


​ ​

संबंधित बातम्या