World Cup 2019 : दोनशेहून अधिक धावा देउनही षटकारांचा नाही घेतला प्रसाद

शैलेश नागवेकर
Friday, 21 June 2019

पण थांबा...असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात तब्बल दोनशेपेक्षा अधिक चेंडू टाकले आहेत, पण एकही षटकार स्वीकारलेला नाही..होय हे खरे आहे ! दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीरने 282 चेंडू टाकले तर पाकिस्तानचा महम्मद आमीरने 216 चेंडू चाकले तरिही त्यांना एकही षटकार मारण्यात आलेला नाही.

वर्ल्ड कप 2019 : मध्येच कधी तरी एकमदच एकतर्फी सामने तर अधून मधून चौकार-षटकारांची विक्रमी बरसात होणारे सामने अशा चढ-उतारांचा खेळ यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सुरु आहे. आठवतेय ना इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने अफगाणिस्तानविरुद्ध मारलेले 17 षटकार !! याच सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक 25 षटकारांचा विक्रमही केला गेला.

आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांवर नजर टाकली तर त्रिशतकी धावा सहजतेने पार होताना दिसत आहेत. बांगलादेशसारखा संघही यात पाठीमागे राहिलेला नाही. थोडक्यात काय तर गोलंदाजांनी धुलाई सुरु आहे. कधी कोणता फलंदाज चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावून  देईल याचा नेम नसतो. मिशेल स्टार्क असो वा इंग्लंडचा ख्रिस व्रोक्स बहुतेक सर्वांना षटकाराचा प्रसाद चाखावा लागलेला आहे.

पण थांबा...असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात तब्बल दोनशेपेक्षा अधिक चेंडू टाकले आहेत, पण एकही षटकार स्वीकारलेला नाही..होय हे खरे आहे ! दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीरने 282 चेंडू टाकले तर पाकिस्तानचा महम्मद आमीरने 216 चेंडू चाकले तरिही त्यांना एकही षटकार मारण्यात आलेला नाही. त्यानंतर नंबर आहे तो वेस्ट इंडीजचा ओशेन थॉमस याचा त्याने 172 चेंडू गोलंदाजी केली पण एकही षटकार स्वीकारला नाही, पण त्यांचे संघ मात्र स्पर्धेत गटांगळ्या खात आहेत.

दक्षिण आफ्रिका सहा सामन्यात चार पराभव
पाकिस्तान पाच सामन्यात तीन पराभव
वेस्ट इंडीज पाच सामन्यात तीन पराभव

अशी षटकार न स्वीकारणाऱ्या गोलंदाजांच्या संघाची कथा आहे. यावरून एक स्पष्ट होते की एकटा गोलंदाज त्याने कितीही चांगली आणि प्रभवी गोलंदाजी केली तरी ती संघाच्या विजयास पुरेशी ठरत नाही. हा टीम गेम आहे त्यामुळे सर्वांची मिळून वज्रमुठ व्हायला हवी

बुमरा आणि भुवीही भेदक
आत्तापर्यंतच्या सामन्यात एकही षटकार न स्वीकारणाऱ्या गोलंदाजांमध्ये ताहीर आणि आमीर आघाडीवर असले तरी भारताचा बुम बुम बुमरा आणि भुवीही आहे. पण त्यांना इतर गोलंदाजांची मिळणारी साथ संघाच्या विजयात टीम वर्क ठरत आहे...

वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत एकही षटकार न स्वीकारणारे गोलंदाज (कंसात चेंडू)
-इम्रान ताहीर (282)
-महम्मद आमीर (216)
-ओशेन थॉमस (172)
-जसप्रित बुमरा (169)
-हमिद हसन (144)
-बेन स्टोक (143)
-भुवनेश्वर कुमार (136)


​ ​

संबंधित बातम्या