शरथ कमलने जींकली ओमान ओपन स्पर्धा, १० वर्षांचा दुष्काळ संपवला
भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमल याने ‘आयटीटीएफ’ चॅलेंजर प्लस ओमान खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यामुळे १० वर्षांनंतर विजेतेपदाची उणीव भरुन काढण्यात ३७ वर्षाच्या भारताच्या अनुभवी शरथला यश आले आहे.
मस्कट : भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमल याने ‘आयटीटीएफ’ चॅलेंजर प्लस ओमान खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यामुळे १० वर्षांनंतर विजेतेपदाची उणीव भरुन काढण्यात ३७ वर्षाच्या भारताच्या अनुभवी शरथला यश आले आहे.
अंतिम फेरीत शरथने पोर्तुगालच्या मार्कोस फ्रेइटासचा ६-११, ११-८, १२-१०, ११-९, ३-११, १७-१५ असा पराभव केला. याआधी २०१० मध्ये त्याने इजिप्त येथील स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याने मोरोक्को येथे २०११ आणि इंडिया ओपन येथे २०१७ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती. मात्र त्याला जेतेपदाने हुलकावणी दिली होती.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीत शरथने पहिले दोन सेट गमावूनही रशियाच्या किरील स्कॅचकोव्हचा ११-१३, ११-१३, १३-११, ११-९, १३-११, ८-११, ११-७ असा पराभव केला.
शरथने आगेकूच केली तरी भारताच्या हरमित देसाईची मात्र अंतिम फेरी गाठण्याची संधी हुकली. फ्रेइटासने उपांत्य फेरीत हरमित देसाईचा ५-११, ११-९, ६-११, ६-११, ११-८, १३-११, ११-३ असा पराभव केला होता.