World Cup 2019 : स्पीन खेळण्याबाबत माहीने घेतल्या शास्त्रीबुवांच्या टिप्स 

मुकुंद पोतदार
Saturday, 6 July 2019

श्रीलंकेविरुद्ध सामन्याच्या पुर्वसंध्येस महेंद्रसिंह धोनीने सरावानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यावेळी शास्त्री डाव्या हाताने चेंडू टाकण्याची ऍक्‍शन करून ग्रीपसह वेगवेगळ्या गोष्टी धोनीला समजावून सांगत होते. त्यावरून धोनीने स्पीनर्सना सामोरे जाण्याबाबत त्यांच्याकडून "टिप्स' घेतल्याचे स्पष्ट झाले.

वर्ल्ड कप 2019 : लीड्स ः श्रीलंकेविरुद्ध सामन्याच्या पुर्वसंध्येस महेंद्रसिंह धोनीने सरावानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यावेळी शास्त्री डाव्या हाताने चेंडू टाकण्याची ऍक्‍शन करून ग्रीपसह वेगवेगळ्या गोष्टी धोनीला समजावून सांगत होते. त्यावरून धोनीने स्पीनर्सना सामोरे जाण्याबाबत त्यांच्याकडून "टिप्स' घेतल्याचे स्पष्ट झाले.
 
विश्वकरंडकातील आधीच्या सामन्यांत फिरकी गोलंदाजीसमोर धोनी अडखळला आहे. त्यावरून सचिन तेंडुलकरने एकदा त्याच्यावर टीका केली, तर सौरव गांगुलीनेही प्रतिकूल मत व्यक्त केले. इतरही देशांचे अनेक तज्ञ धोनीतील फलंदाज संपल्याचा शेरा मारत आहेत. या पार्श्वभूमीवर धोनीने शास्त्री यांच्याशी सुमारे 20 मिनिटे सखोल चर्चा केली.

शास्त्री मनगट तसेच बोटांच्या ऍक्‍शन करून धोनीला चेंडूची फिरक, मनगटाचा वापर करून हातातून चेंडू सोडण्याची कृती, आदी समजावून सांगत होते. धोनी ते अत्यंत शांतचित्ताने आणि कमालीच्या गांभीर्याने ऐकत होता. शुक्रवारी सराव सत्र ऐच्छिक असूनही धोनीने दीर्घ काळ नेटमध्ये फलंदाजी केली. त्यानंतर त्याने शास्त्रीबुवांच्या टिप्स घेतल्या. त्यामुळे त्याचा फलंदाजीतील कामगिरी उंचावण्याचा निर्धार प्रकट झाला. 

मुंबईकर शास्त्री हे स्वतः दर्जेदार फिरकी गोलंदाज होते. याशिवाय त्यांनी फलंदाज म्हणून फिरकी माऱ्याविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. 1991-92 च्या मोसमात शास्त्रींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीला झालेल्या तिसऱ्या कसोटीत 200 धावांची खेळी केली होती. तेव्हा ते सलामीला आले होते. त्या कसोटीत शेन वॉर्नने पदार्पण केले होते, पण त्याची शास्त्रींनी धुलाई केली होती. त्याच कसोटीत सचिनने नाबाद 148 धावा केल्या होत्या. वॉर्नला सामोरे जाण्याबाबत शास्त्रींनी त्याला मार्गदर्शन केले होते, मग सचिननेही वॉर्नविरुद्धची चकमक जिंकली होती.

सिडनीची कसोटी पारंपरिक दृष्ट्या फिरकीला अनुकूल मानली जाते. तेव्हा वॉर्नला 45 षटकांत 150 धावांचे मोल द्यावे लागले होते. शास्त्रींना त्यानेच बाद केले होते, पण त्याआधीच वॉर्नचे कसोटी पदार्पण फसले होते. शास्त्री यांनी कसोटीत 151, तर वन-डेमध्ये 129 विकेट टिपल्या आहेत. त्यांनी इंग्लंडमध्ये 1990 मध्ये ओव्हलवर 187, तर लॉर्डसवर 100 धावा केल्या होत्या. हा अनुभव त्यांनी धोनीबरोबर "शेअर' केला. 


​ ​

संबंधित बातम्या