सिकंदरला मात्र द्यावी लागणार चाचणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 September 2019

महाराष्ट्राच्या सिकंदर खान याला राष्ट्रीय विजेतेपदानंतरही 23 वर्षांखालील जागितक कुस्ती स्पर्धेत खेळण्यासाठी पुढील आठवड्यात दिल्लीच्या विकीविरुद्ध निवड चाचणी लढत खेळावी लागणार आहे. 

पुणे : महाराष्ट्राच्या सिकंदर खान याला राष्ट्रीय विजेतेपदानंतरही 23 वर्षांखालील जागितक कुस्ती स्पर्धेत खेळण्यासाठी पुढील आठवड्यात दिल्लीच्या विकीविरुद्ध निवड चाचणी लढत खेळावी लागणार आहे. 

भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 23 वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा नगरमध्ये शिर्डी येथे सुरू आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिकंदर खान याने आपली स्वतंत्र छाप पाडताना फ्री-स्टाईलच्या 92 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राला या प्रकारात एकमेव सुवर्णपदक मिळाले. या खेरीज प्रत्येकी एक रौप्य आणि एक ब्रॉंझपदकही महाराष्ट्राला मिळाले. या स्पर्धा प्रकारात पहिल्या तीनातही महाराष्ट्राला स्थान मिळाले नाही. हरियना, सेनादल आणि चंडिगड यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. 

एकूण दहा वजन प्रकारात झालेल्या या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता हा 23 वर्षांखालील जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. ही स्पर्धा हंगेरीत बुडापेस्ट येथे होणार आहे. याला सिकंदर खानचा अपवाद राहील. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतरही त्याला जागतिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी चाचणी द्यावी लागणार आहे. 

का द्यावी लागणार चाचणी
देशात 92 किलो वजन गटात दिल्लीचा विकी हा अव्वल मल्ल आहे. कुमार गटात असूनही या वर्षी त्याने वरिष्ठ गटातही यश मिळविले आहे. या वर्षी वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. तसेच कुमार गटाच्या जागितक स्पर्धेत त्याने ब्रॉंझपदक मिळविले होते. राष्ट्रीय स्तरावरही तो विजेता आहे. त्याने या स्पर्धेपूर्वी काही दिवस आपण तंदुरुस्त नसल्याने खेळू शकत नसल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे त्याला एक संधी देण्यासाठी ही चाचणी घेण्यात आल्याचे भारतीय कुस्तीगीर महासंघाच सहसचिव विनोद तोमर यांनी सांगितले. 

हा निर्णय स्पर्धा सुरू होतानाच 92 किलो वजनगटातील सर्व मल्ल, तसेच संघांच्या व्यवस्थापकांना कळिवण्यात आला होता. लढतीच्या दिवशी देखील व्यासपीठावरुन या गटातील विजेत्यास चाचणी द्यावी लागेल असे वारंवार सांगण्या येत होते. त्यामुळेच सिकंदरला आता पुढील आठवड्यात होणाऱ्या चाचणीसाठी सज्ज रहावे लागेल. सिकंदरनेही आपण या आव्हानासाठी तयार असल्याचे सांगितले. सिकंदर सोलापूर येथील मोहोळ गावचा असून, तो अस्लम काझी यांच्याकडे मेहनत करतो.


​ ​

संबंधित बातम्या