World Cup 2019 : अँजेलो मॅथ्यूजचे शतक; भारतासमोर 265 धावांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 July 2019

अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या शानदार शतकाच्या जोरावर श्रीलंकेने भारताविरुदधच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली. 4 बाद 55 अशा आवस्थेनंतर मॅथ्यूजने एक बाजू खंबीरपणे लढवली तर भारताकडून बुमराने तीन विकेट मिळवल्या. 

वर्ल्ड कप 2019 : लीडस्‌ : अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या शानदार शतकाच्या जोरावर श्रीलंकेने भारताविरुदधच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली. 4 बाद 55 अशा आवस्थेनंतर मॅथ्यूजने एक बाजू खंबीरपणे लढवली तर भारताकडून बुमराने तीन विकेट मिळवल्या. 

भारतासाठी ही लढत उपांत्य फेरीसाठी सराव सामना आहे त्याचबरोबर विजय मिळवून अव्वल क्रमांकासाठी प्रयत्न करणाराही आहे. फलंदाजीस उपयुक्त अशी खेळपट्टी आणि हवामानही असताना भारतीय गोलंदाजांनी प्रामख्याने बुमरा आणि रवींद्र जडेजा यांनी श्रीलंका फलंदाजीला मर्यादित ठेवले. 2011 च्या विश्‍वकरंडक अंतिम सामन्यानंतर हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध लढत आहेत. 

भारतीय संघाने आज दोन बदल केले. महम्मद शमीऐवजी जडेजा तर चहलऐवजी कुलदीप यादव यांना संधी दिली. जडेजाने 10 षटकांत 40 धावांत एक विकेट, एक झेल अशी कामगिरी करून उपांत्य फेरीसाठी संघ निवडताना आपली दावेवारी जाहीर केली. भुवनेश्‍वर कुमारने मात्र निराश केले. 10 षटकांत त्याने एक विकेट तिही अंतिम षटकात मिळवताना 73 धावा खर्ची घातल्या त्याचबरोबर एक सोपा झेलही सोडला. 

श्रीलंकेकडे जयसूर्याच्या स्टाईलमध्ये खेळणारा कुशल परेरा आणि अविष्का फर्नांडो असे जबरदस्त फलंदाज आहेत त्यातच प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी यामुळे श्रीलंका मोठ्या धावसंखेसाठी प्रयत्न करणार हे उघड होते. कर्णधार करुणारत्ने आणि कुशल यांनी भुवनेश्‍वर कुमारवर हल्ला चढवता त्याचवेळी बुमारने त्याचे पहिले 16 चेंडू निर्धाव टाकले होते. अखेर बुमरानेच या दोघांना धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. 

अविष्काने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात करत 21 चेंडूत 20 धावा केल्या पण पहिला बदल म्हणून गोलंदाजीस आलेल्या हार्दिकने त्यालाही धोनीकडे झेल द्यायला लावला. त्यानंत जडेजाने आपल्या पहिल्याच षटकांत कुशल मेंडिसला ड्रेसिंग रुमचा रस्ता दाखवला धोनीने त्याला यष्टीचीत केले.अशा प्रकारे श्रीलंकेच्या पहिले चार फलंदाज बाद होण्यात धोनीचा हात होता. 
श्रीलंका 4 बाद 55 आणि षटकेही 12 झाली होती. त्यांच्या डावावर पूर्ण वर्चस्व मिळवण्याची संधी होती, पण डावाच्या मध्यावर प्रामुख्याने कुलदीप यादवला ब्रेक थ्रु देता आला नाही. एव्हाना चेंडूही जुना झाला होता. स्वींग किंवा फिरक काहीच मिळत नव्हती. या परिस्थितीचा मॅथ्यूजने चांगला फायदा घेतला. लाहिरु थिरीमनने त्याला साथ दिली या दोघांनी 124 धावांची भागीदारी केली. या दरम्यान थिरिमनेचा सोपा झेल भुवनेश्‍वर कुमारने सोडला पण कुलदीपने त्याला बाद केले. कुलदीपची ही एकमेव विकेट ठरली. 
त्यानंतर मॅथ्यूजने थिरिमनेसह 74 धावांची भागीदारी केली त्यामुळे श्रीलंका अडीचशे धावा करणार हे निश्‍चित झाले. अखेरच्या पाच षटकांत बुमराचे यॉर्कर खेळणे श्रीलंकेच्या फलंदाजांना खेळणे अवघड गेले. त्यातच मॅथ्यूजला बुमरानेच बाद केले. 

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : 50 षटकांत 7 बाद 264 (अविष्का फर्नांडो 20 -21 चेंडू, 4 चौकार, अँजेलो मॅथ्यूज 113 -128 चेंडू, 10 चौकार, 2 षटकार, लाहिरू थिरिमने 53 -68 चेंडू, 4 चौकार, धनंजय सिल्वा नाबाद 29 -36 चेंडू, 1 चौकार, भुवनेश्‍वर कुमार 10-0-73-1, जसप्रित बुमरा 10-2-37-3, हार्दिक पंड्या 10-0-50-1, रवींद्र जडेजा 10-0-40-1)


​ ​

संबंधित बातम्या