विद्यार्थ्यांभोवतीही उत्तेजक सेवनाचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 June 2019

दिवसेंदिवस यातील खेळाडूंची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ गटातील खेळाडूंची नवी नावे समोर आली, तेव्हा वेटलिफ्टिंग आणि ऍथलेटिक्‍स खेळाडूंची संख्या अधिक आहे. 

नवी दिल्ली : देशातील क्रीडा क्षेत्राला बसलेला उत्तेजक सेवानाचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला आहे. वरिष्ठ गटातीलच नाही, तर आता शालेय विद्यार्थी देखील यात अडकू लागल्याने राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था (नाडा) खेळाडू आणि प्रशिक्षकांना यातील धोका पटवून देण्यात अपयशी ठरल्याचे यावरून सिद्ध होते. 

दिवसेंदिवस यातील खेळाडूंची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ गटातील खेळाडूंची नवी नावे समोर आली, तेव्हा वेटलिफ्टिंग आणि ऍथलेटिक्‍स खेळाडूंची संख्या अधिक आहे. 

विशेष म्हणजे शालेय स्तरावरील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचाही यात समावेश आहे. या स्पर्धा या वर्षीच जानेवारी महिन्यात पुणे येथे झाल्या होत्या. या मालिकेत 2018 मध्ये झालेल्या पहिल्या 17 वर्षांखालील स्पर्धेतील पाच सुवर्णपदक विजेत्यांसह एकूण 12 खेळाडू उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळले होते. 
या सर्वा खेळाडूंनी शारीरिक क्षमता वाढविणारे उत्तेजक घेतल्याचे पहिल्या चाचणीत स्पष्ट झाले असून, या सर्वांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. 

कोण कोण सापडले 
वेटलिफ्टिंग : रवी कुमार कटुलु (दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा 2010 विजेता), पुर्णिमा पांडे (कुमार राष्ट्रकुल स्पर्धा 2016 विजेती), 
ऍथलेटिक्‍स : धरमराज यादव (फेडरेशन करंडक आणि राष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धा 2018 थाळीफेक विजेता), ज्याती सिंग (महिला नवी दिल्ली अर्ध मॅरेथॉन 2019 विजेती) 

खेलो इंडियातील स्पर्धक 
रोहित आहिरे : ग्रीको रोमन कुस्तीगीर 
साहिल पवार : 50 मीटर फ्री-स्टाईल जलतरण 
सत्यम चौधरी : गोळाफेक खेळाडू 

यांच्यासाठी दरवाजे बंद 
केरळचा उदयोन्मुख लाब उडी खेळाडू के.एम. श्रीकांत 14 नोव्हेंबर 2017 मध्ये दोषी आढळला होता. त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या कारवाईला आव्हान देणारी त्याची याचिका उत्तेजक विरोधी शिस्तपालन समितीने (एडीडीपी) फेटाळली असल्यामुळे त्याच्यावरील बंदी कायम राहिली. तसेच मध्यम पल्ल्याची धावपटू प्रियांक पन्वर हिची देखील याचिका "एडीडीपी'ने फेटाळल्यामुळे तिच्यावरील 8 वर्षांची बंदी कायम राहिली. ती देखील 2017 मध्येच दोषी आढळली होती. या शिक्षेमुळे दोघांसाठी पुन्हा परतण्याचे दरवाजे बंद झाल्याचे मानले जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या