चॅम्पियन्स लीग - सुआरेझ प्रभावी, बार्सिलोनाची सरशी

वृत्तसंस्था
Thursday, 3 October 2019

- लुईस सुआरेझच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत इंटर मिलानचे कडवे आव्हान 2-1 असे परतविले

- गतविजेत्या लिव्हरपूलने सैझबर्गचे कडवे आव्हान 4-3 असे परतविले

- गतवर्षी लक्षवेधक कामगिरी केलेल्या ऍजॅक्‍सने व्हॅलेन्सियाचा 3-0 पाडाव करीत सलग दुसरा विजय मिळविला

लंडन -  लुईस सुआरेझच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत इंटर मिलानचे कडवे आव्हान 2-1 असे परतविले. पूर्वार्धातील इंटरचे वर्चस्व सुआरेझ-लिओनेल मेस्सीने उत्तरार्धात मोडून काढले. 

इंटर गेल्या काही वर्षांत बार्सिलोनास त्यांच्या घरच्या मैदानावर हरविण्यात अपयशी ठरले आहेत. पण, त्यांनी दुसऱ्या मिनिटास आघाडी घेतली आणि त्याच वेळी भक्कम बचाव करीत बार्सिलोनास जेरीस आणले होते. इंटर बाजी मारणार, असे वाटत असतानाच सुआरेझने बार्सिलोनास बरोबरी साधून दिली आणि त्यानंतर सुआरेझनेच मेस्सीची अप्रतिम चाल सत्कारणी लावली. 
बार्सिलोनासाठी हा विजय मोलाचा होता. मेस्सी पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. ला लिगामध्ये त्यांची पीछेहाट झाली आहे. पण, आता मेस्सी पूर्ण बहरात खेळला आणि त्यांची गाडी जणू आता रुळावर आली. 
दरम्यान, गतविजेत्या लिव्हरपूलने सैझबर्गचे कडवे आव्हान 4-3 असे परतविले. सुरवातीच्या तीन गोलनंतर लिव्हरपूलचा खेळ खालावला होता. पण, मोहम्मद सालाह याने लिव्हरपूलचे वर्चस्व राखले. 
गतवर्षी लक्षवेधक कामगिरी केलेल्या ऍजॅक्‍सने व्हॅलेन्सियाचा 3-0 पाडाव करीत सलग दुसरा विजय मिळविला. लिऑनने आरबी लिपझिगला 2-0 असे हरवत दुसरा क्रमांक मिळविला. 
 


​ ​

संबंधित बातम्या