चॅंपियन्स लीग - एम्बाप्पेचे 22, तर स्टर्लिंगचे 11 मिनिटांत तीन गोल

वृत्तसंस्था
Thursday, 24 October 2019

- चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारच्या सामन्यात मॅंचेस्टर सिटीचा रहीम स्टर्लिंग आणि पीएसजीचा किलिएन एम्बाप्पे यांची हॅटट्रिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

- एम्बाप्पेने 22 मिनिटांत तीन गोल केले

-  स्टर्लिंगने 11 मिनिटांत तीन गोल केले.

पॅरिस - चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारच्या सामन्यात मॅंचेस्टर सिटीचा रहीम स्टर्लिंग आणि पीएसजीचा किलिएन एम्बाप्पे यांची हॅटट्रिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या दोन्ही खेळाडूंच्या जोरावर त्यांच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठा विजय मिळविला. 
फ्रान्सच्या जगज्जेतेपदाचा शिल्पकार ठरलेल्या एम्बाप्पे याला बेल्जियमच्या क्‍लब ब्रुगेविरुद्धच्या लढतीत राखीव खेळाडू म्हणून उतरवले होते. त्यानंतरही त्याचा धडाका इतका होता की, त्याने 22 मिनिटांत तीन गोल केले. त्याने प्रथम 61व्या, नंतर 79 आणि 83व्या मिनिटाला गोल केले. "पीएसजी'साठी अन्य गोल माऊरो इकार्डी याने 7व्या आणि 63व्या मिनिटाला केले. 
या विजयासह "पीएसजी' संघाने गटात रेयाल माद्रिद संघावर पाच गुणांची आघाडी घेतली आहे. त्यांचे पहिले स्थान कायम आहे. रेयाल दुसऱ्या आणि ब्रुगे तिसऱ्या स्थानावर आहे. या गटातील अन्य एका सामन्यात रेयाल माद्रिदने टोनी क्रुजच्या एकमात्र गोलच्या जोरावर तुर्कीच्या ग्लातासारे क्‍लबचा 1-0 असा पराभव केला. 

स्टर्लिंगची हॅटट्रिक 
"क' गटात मॅंचेस्टर सिटी संघाने इटलीच्या ऍटलांटा क्‍लबचा 5-1 असा पराभव केला. सिटीच्या सर्गियो ऍग्युएरो याने 34 आणि 38व्या मिनिटाला गोल केले. मध्यंतराला सिटी 2-1 असे आघाडीवर होते. अटलांटाचा गोल रस्लन मलिनोवस्तीने 28व्या मिनिटाला केला. उत्तरार्धात स्टर्लिंगने 11 मिनिटांत तीन गोल केले. त्याने प्रथम 58व्या, नंतर 64 आणि 69व्या मिनिटाला गोल केले. अँटलांटा संघ प्रथमच चॅंपियन्स लीग खेळत आहे. सिटी तीन सामन्यात नऊ गुणांसह आघाडीवर आहे. 

युवेंटिसची आगेकूच 
ट्युरिन ः इटलीच्या युवेंटिस क्‍लबने रशियाच्या लोकोमोटिव मॉस्को संघाचा 2-1 असा पराभव केला. युवेंटिसच्या विजयात अर्जेंटिनाचा स्ट्रायकर पॉल डाईबाला याने नोंदविलेले दोन गोल निर्णायक ठरले. लोकोमोटिव संघाने 30व्या मिनिटालाच आघाडी घेतली होती. एलसेक मिरानचुक याने हा गोल केला. मात्र, त्यानंतर उत्तरार्धात डाईबाला 77 आणि 79 व्या मिनिटाला गोल करून संघाला विजय मिळवून दिला. युव्हेंटिस सात गुणांसह "ड' गटात आघाडीवर आहे. 

लेवोंडस्कीचे कमालीचे सातत्य 
अथेन्स ः जर्मनीच्या बायर्न म्युकी क्‍लबने आपली आगेकूच कायम राखताना ग्रीसच्या ऑलिंपिकोस क्‍लबचा 3-2 असा पराभव केला. रॉबर्ट लेवोंडस्की याच्या कामगिरीमधील कमालीचे सातत्य हेच त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. त्याने सलग बाराव्या सामन्यात गोल केला. गेल्या 13 लीग सामन्यात त्याने 18 गोल केले आहेत. युसूफ अल अरबी याने 23व्या मिनिटाला ऑलिंपिकोसला आघाडीवर नेले होते. त्यानंतर 34व्या मिनिटाला लेवोंडस्कीने बायर्नला बरोबरी साधून दिली. त्यानंतर उत्तरार्धात 62व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल करून संघाला आघाडीवर नेले. कोरेंटिन टोलिसो याने 75व्या मिनिटाला गोल करून बायर्नचा विजय निश्‍चित केले. पण, 79व्या मिनिटाला त्यांना आणखी एक गोल स्वीकारावा लागला. सांतोस टोरेस याने हा गोल केला. 


​ ​

संबंधित बातम्या