सुदीरामन कप : मलेशियास हरवल्यासच भारतास बाद फेरीची संधी

वृत्तसंस्था
Monday, 20 May 2019

प्रामुख्याने दुहेरीवर भर असलेल्या सुदीरामन कप बॅडमिंटन स्पर्धेत मलेशियास पराजित करून विजयी सलामी देण्याची संधी भारतास आहे. एकेरीतील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मलेशिया कमकुवत झाले आहेत.

मुंबई : प्रामुख्याने दुहेरीवर भर असलेल्या सुदीरामन कप बॅडमिंटन स्पर्धेत मलेशियास पराजित करून विजयी सलामी देण्याची संधी भारतास आहे. एकेरीतील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मलेशिया कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दुहेरीतील एक विजयही भारताच्या बाद फेरीची शक्‍यता उंचावू शकेल.
चीनमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतास पहिले दोन दिवस ब्रेक आहे.

भारताचा समावेश वन-डीमध्ये आहे. या गटातील सलामीच्या लढतीत चीनने मलेशियाचा 5-0 असा धुव्वा उडवला आहे. या पराभवामुळे मलेशिया भारताविरुद्ध अधिक त्वेषाने मैदानात उतरेल, पण ली चॉंग वेई याच्या अनुपस्थितीत मलेशियाकडे पुरुष एकेरीत चांगला खेळाडू नाही. जिन वेई गॉह किंवा सोनिला चीआ यापैकी कोणाचीही साईना नेहवाल अथवा पी. व्ही. सिंधूला आव्हान देण्याची क्षमता नाही. या परिस्थितीत भारत एकेरीची लढत जिंकू शकेल. त्यामुळे मलेशियाची मदार दुहेरीवर असेल.

चीनच्या ताकदवान जोडींना मलेशियाने बऱ्यापैकी आव्हान दिले. आता सात्विक साईराज तसेच अश्‍विनी पोनप्पा या भारताच्या दुहेरीतील खेळाडूंनी चमक दाखवल्यास अशक्‍य काहीही नाही. सात्विक-चिराग शेट्टीने गेल्या काही महिन्यांत काही अविश्‍वसनीय विजय मिळवले आहेत, त्या कामगिरीची पुनरावृत्ती घडल्यासच भारतास बाद फेरीची संधी असेल. मलेशियाविरुद्ध पराजित झाल्यास भारतास चीनविरुद्ध संधीच नसेल असे मानले जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या