जोहोर कप हॉकी - भारताचा जपानकडून पराभव

वृत्तसंस्था
Tuesday, 15 October 2019

- भारतीय कुमार हॉकी संघाला सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धेत मंगळवारी अत्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात जपानकडून 3-4 असा पराभव पत्करावा लागला

- या पराभवानंतरही भारताचे दुसरे स्थान कायम राहिले आहे. भारताचे 3 सामन्यात 2 विजय, एका पराभवासह 6 गुण झाले आहेत

- चांगली आक्रमणे करूनही फटक्‍यात अचूकता नसल्याचा फटका भारताला बसला आणि पराभवाचा सामना करावा लागला

जोहोर बारू (मलेशिया) - भारतीय कुमार हॉकी संघाला सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धेत मंगळवारी अत्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात जपानकडून 3-4 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतरही भारताचे दुसरे स्थान कायम राहिले आहे. भारताचे 3 सामन्यात 2 विजय, एका पराभवासह 6 गुण झाले आहेत. ब्रिटन संघ तीनही सामने जिंकून 9 गुणांसह आघाडीवर आहे. 
जपानने सामन्याच्या सुरुवातीलाच आघाडी घेतली. त्यांनी आपल्या पहिल्या आक्रमणातच मिळालेला पहिला कॉर्नर सत्कारणी लावला. मास्तुमोटो याने हा गोल केला. अर्थात, भारतीय खेळाडूंचे प्रतिआक्रमण देखील धारदार ठरले. त्यांनी तिसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला. मात्र, प्रताप लाक्राचा फटका जपानचा गोलरक्षक ताकुमी किटाग्वा याने तो शिताफीने अडवला. पहिल्या सत्रापर्यंत भारतीय आक्रमणे चांगली होत होती. पण, त्यांना बरोबरी साधण्यात यश आले नाही. भारताच्या बचाव फळीने देखील चांगली कामगिरी बजावल्यामुळे त्यांनी पहिले सत्र मारून नेले. मात्र, दुसऱ्या सत्रात जपानने आपल्या आक्रमणांना वेगवान खेळाची जोड देत 22व्या मिनिटाला दुसरा गोल केले. या वेळी मिळालेला कॉर्नर कोसेई कावाबे याने सत्कारणी लावताना जपानला विश्रांतीला 2-0 शी आघाडी मिळवून दिली. 
उत्तरार्धात भारताच्या आक्रमणाला यश आले. या वेळी मिळालेला कॉर्नर मनदीप मोर आणि गुरसाहिब सिंग यांनी एकत्रितपणे सत्कारणी लावला. मात्र, दोन मिनिटांत जपानच्या केईटा वातानाबे याने जपानला मिळालेल्या पाचव्या कॉर्नरचे गोलात रुपांतर करून आघाडी 3-1 अशी वाढवली. त्यानंतर 37व्या मिनिटाला कावाबे याने गोल करून जपानला 4-1 असे सुस्थितीत नेऊन ठेवले. 
भारताने या मोठ्या पिछाडीनंतरही आपला प्रतिकार कायम ठेवत शारदानंद तिवारी याने केलेल्या गोलच्या जोरावर पिछाडी भरून काढली. अखेरच्या सत्रात भारतीयांनी कमालीचा आक्रमक खेळ केला. सामन्याच्या 53व्या मिनिटाला त्यांनी जपानचा बचाव भेदून कॉर्नर मिळविला. त्यावर प्रताप लाक्रा याने गोल करून पिछाडी 4-3 अशी कमी केली. मात्र, संपूर्ण सामन्यात चांगली आक्रमणे करूनही फटक्‍यात अचूकता नसल्याचा फटका त्यांना बसला आणि पराभवाचा सामना करावा लागला. 


​ ​

संबंधित बातम्या